अहमदनगर

नगर : बहीण-भावाच्या नात्याला जीएसटीची नजर

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : बहिण-भावाच्या प्रेमाचा रक्षाबंधनचा सन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राख्यादेखील जीएसटीखाली आल्यामुळे किंमतीत 5 टक्के दरवाढ झाली आहे. लाडक्या भाऊरायाला ओवाळत हाती राखी बांधण्यासाठी बहिणींची बाजारातील राख्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने सन उत्सव अगदीच साधेपणाने पार पडले. यंदा सरकारने उत्सव निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. यंदाची नारळी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी येत आहे. रक्षाबंधनाची पूर्वतयारी म्हणून बहिणींनी राख्यांच्या दुकानांत गर्दी केली आहे. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार साध्या धाग्यापासून डिजिटलपर्यंत विविध प्रकारच्या राख्या दुकानांमध्ये आहेत. खास मुंबई, दिल्ली, राजकोट येथून व्यापार्‍यांनी राख्या मागविल्या आहेत.

कलाकुसरीच्या व लाईटच्या लहान मुलांच्या राख्या नगरमध्ये घरीच बनविल्या जातात. बाजारात सध्या खास लहान मुलांसाठी लाईटमध्ये डोरेमॅन, छोटा भीम, मोटू-पतलू, मिकी माऊस, देवमासा अशा वेगवेगळ्या कार्टून्स ग्राहकांची पसंती आहे. इमिटेश्न ज्वेलरी, ब्रेसलेट, जरी, ओम, स्वास्तिक, गोंड्याच्या, डायमंड स्टोन, स्पंजच्या राख्यांना चांगली मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या किंमतीत 5 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीचाही राख्यांच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे.

सध्या बाजारात अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. आम्ही ठोक विक्री करतो. त्यामुळे राख्या स्वस्त पडतात. होलसेल भावात आम्ही चोविस रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत विक्री करतो. या वर्षी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

– मुरली नवलानी, राख्यांचे ठोक व्यापारी.

आमची तीन महिन्यापासून तयारी सुरू असते. त्यात पॅकिंग, सजावट, खड्यांची कलाकुसर केली जाते. बाहेरगावच्या किरकोळ विक्रेत्यांना माल पाठवण्यासाठी लगबग सुरू असते. त्यांच्या आवडीनुसार व मागणीनुसार खास राख्या बनवल्या जातात. मागील वर्षी कोविडमुळे अनेक गावे बंद होती. यावर्षी मात्र रक्षाबंधनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

– ज्योती राऊत, किरकोळ राखी विक्रेत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT