अहमदनगर

नगर : बळीराजाला पावसाची चातकासारखी आस

अमृता चौगुले

शिरसगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी खते-बियाणे व शेती मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कडक ऊन तर काहीवेळ ढगाळ वातावरण असा ऊन- सावल्यांचा लपंडाव सुरु आहे. तापमानात किंचित घसरण झाली तरी उन्हाची तीव्रता जाणवते.जून महिना अर्धा संपला तरी बळीराजाला पावसाची अगदी चातकाप्रमाणे प्रतिक्षा लागली आहे.

दररोज ढगाळ वातावरण निर्माण होऊन वारा सुटतो, परंतु पाऊस पडत नसल्याने दमट वातावरणामुळे अंगातून अक्षरशः घामाच्या धारा निघत आहेत. ज्या शेतकर्‍यांने पहिल्या पावसात पेरणी केली आहे ती पिके कोमेजली आहे. सर्व शेतकर्‍यांनी बियाणे- खते आत्ताच खरेदी करून ठेवली, मात्र यंदा शेतकर्‍यांनी सोयाबिनकडे पाठ फिरवली असून, तो कपाशी पिकाकडे वळाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्यावर्षी सोयाबिनला सगळ्यांनी पसंती दिली होती, पण वेळेत पाऊस न पडल्याने उत्पन्नात घट झाली. कपाशी पीक कमी शेतकर्‍यांनी घेतले होते. भावही 6 हजारपेक्षा जास्त होता. यंदा शेतकरी पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला आता पावसाची आस लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

खते खरेदी केली, पण..!

सध्या पहिला पाऊस झाल्यानंतर लगेच शेतीची मशागत करून ठेवली.बियाणे खरेदी करून ठेवले. पुढे खतांच्या किमती वाढतील किंवा ते मिळणार नाहीत, असे वाटल्याने आत्ताच खते खरेदी केली आहेत.पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर लगेच बियाणे पेरण्याची तयारी शेतकरी करीत आहेत, पण पावसाने दडी मारल्याने सर्वत्र निराशेचे चित्र दिसत आहे. उत्तर नगर जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा आहे.
-ईम्रान पटेल, शेतकरी, शिरसगाव, ता. कोपरगाव.

वारीच्या शेतकर्‍यांना धास्ती..!

यावर्षी मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने कोपरगावच्या वारीसह परिसरातील बळीराजा धास्तावला आहे. पाऊस उशीरा पडला तरी पेरणी करावीच लागणार आहे. पाऊस पडल्यावर बियाणे, रासायनिक खतांची टंचाई निर्माण होते, ती कृत्रिम का असेना. शेतकरी बि- बीयाणे असो वा खते अगोदर खरेदी करुन ठेवतात. आता बाजारात बियाणे उपलब्ध आहे, पण काहींना रासायनिक खते मिळत नाही. आधीच पावसाने शेतकर्‍यांना हुलकावणी देण्याचे काम चालविले आहे. रासायनिक खते हुल देत आहेत. शेतकरी सोसायटी, पतसंस्था वा खासगी सावकाराकडून अव्वाच्या- सव्वा व्याज दराने पैसे घेऊन खरीपाची तयारी करीत आहे.

मशागतीचे भाव कमी होतील!
डिझेलचे दर 9 रुपयांनी कमी झाल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नांगरणी, पेरणीचे भाव काहीसे कमी झाले. मशागतीचे भाव कमी होतील.
-प्रवीण पठाडे, ट्रॅक्टर चालक, गोधेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT