अहमदनगर

नगर : बलखंडीबाबा मंदिरातून चांदीचा घोडा चोरीला

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या माणिकदौंडी येथील बलखंडीबाबा मंदिरातील पाच किलो वजनाचा चांदीचा घोडा चोरट्यांनी चोरून नेला. चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि.20) सकाळी उघडकीस आली. मंदिराचे पुजारी रमू बाबू पठाण 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता मंदिरात स्वच्छतेसाठी गेले. त्यावेळी त्यांना गेटचे कुलूप तुटलेले व गेट उघडे असलेले दिसले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलविले होते. चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याने श्वानाने तेथेच मार्ग दाखविला. माणिकदौंडी गाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या बलखंडीबाबा मंदिरातील पुजारी रमू पठाण 19 जुलै रोजी रात्री मंदिरात दिवाबत्ती करून मंदिराच्या गेटला कुलूप लावून घरी गेले. पठाण 20 जुलैला सकाळी सहा वाजता मंदिरात स्वच्छतेसाठी गेले. त्यावेळी त्यांना गेटचे कुलूप तुटलेले व गेट उघडे असलेले दिसले.

रमू पठाण यांनी आलमगीर पठाण, पोपट पठाण व पोलिस पाटील वंसत वाघमारे यांना बोलावून घेतले. त्यावेळी पाहिले असता मंदिरातील कपाटातील पाच किलो वजनाचा व सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा चांदीचा घोडा चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, नीलेश म्हस्के, अतुल शेळके यांनी बलखंडीबाबा मंदिराला भेट दिली. मंदिराचे पुजारी रमू बाबू पठाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी पंचनामा केला, पाहणी केली. श्वानाने घटनास्थळाजवळच माग दाखविला; मात्र चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याने पुढील माग सापडला नाही. चोरट्यांनी मंदिरातीला देवांच्या किमती ऐवजावर डल्ला मारला आहे.

परिसरातील लोकांचे ग्रामदैवत बलखंडीबाबा सर्वांचे श्रद्धास्थान आहे. चोरीचा तपास त्वरित व्हावा, अशी मागणी संपूर्ण परिसरातील नागरिकांतर्फे होत आहे. छोट्यामोठ्या चोरीच्या घटना माणिकदौंडी परिसरात गेल्या महिन्यांभरापासून सुरू आहेत. चोरीचे सत्र बंद होऊन चोरटे पकडले जावेत, ही ग्रामस्थांची मागणी आहे.

– समीर पठाण, उपसरपंच, माणिकदौंडी.

SCROLL FOR NEXT