अहमदनगर

नगर : फरारी आरोपीस लातूरमध्ये केले जेरबंद

अमृता चौगुले

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, वाळूमाफिया, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 चे कलम 3 (2) (एमपीडीए)प्रमाणे एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित झाल्यानंतर फरार झालेला आरोपी विजय बाबुराव आव्हाड याचा अहमदननगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन लातूरमध्ये ताब्यात घेत नाशिक कारागृह येथे रवाना केले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलिस ना ईक सुरेश माळी, शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आडबल, रवि सोनटक्के, पोलिस मेघराज कोल्हे व हवालदार चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

जामीनावर सुटल्यावरही सुरूच होत्या कुरापती

याबाबत पोलिसांकडून समजलेले माहिती अशी की, तालुक्यातील जांभळी येथील सराईत गुन्हेगार विजय बाबूराव आव्हाड (वय 38, रा.जांभळी, ता.पाथर्डी) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, फसवणूक, सरकारी कामात अडथळा व अवैध दारुविक्री असे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर व न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपी विजय बाबुराव आव्हाड याच्या गुन्हेगारी कारवाया चालूच होत्या.

त्यामुळे आरोपी विजय आव्हाड यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलिस देवीदास तांदळे यांनी तीन महिने अत्यंत गोपनीयरित्या काम करून 319 पानांचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांमार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक नगर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 19 मे 2022 रोजी प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन आरोपीस एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.

आदेश पारित झाल्यानंतर आरोपी विजय आव्हाड हा फरार झाल्याने पोलिसांनी कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू करून आरोपी आव्हाड याचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍यामार्फत आरोपी आव्हाड हा लातूर येथे लपवून राहत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ लातूर येथे पथक रवाना केले.

असे घेतले पोलिसांनी ताब्यात

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी लातूर शहरात तीन दिवस मुक्काम करून आरोपी विजय बाबुराव आव्हाड याचे वास्तव्य व ठावठिकाणा याबाबत माहिती घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यास शारदानगर, लातूर शहर,(जि. लातूर) येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी नाशिक कारागृहात रवाना केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT