अहमदनगर

नगर : प्रवरासंगम येथे घेणार जलसमाधी; प्रकल्पग्रस्तांचा इशारा

अमृता चौगुले

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देश एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मोठ्या धुमधडाक्यात तयारी करत आहे, तर दुसरीकडे जायकवाडी व मुळा प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणात जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी प्रवरासंगम येथे हे आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. जायकवाडी व मुळा प्रकल्पासाठी विस्थापितांचे प्रश्न गेल्या सुमारे 50 वर्षांनंतरही पूर्णपणे सोडविले गेलेले नाहीत. असंख्य प्रकल्पग्रस्तांचे नियमानुसार अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यांना न्याय्य हक्कांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार जमिनींचे वाटप झालेले नाही. त्यांच्या वारसांना शासकीय नोकर्‍यांत सामावून घेण्यात आले नाही. ज्यांना जमिनी वाटप करण्यात आल्या, त्यांच्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्याबाबत शासकीय पातळीवर घोषणा करण्यात आलेली असली, तरी प्रत्यक्षात कार्यवाहीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात जिल्हा वन अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तसेच जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी याप्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याची त्यांना अपेक्षा आहे. तरीही तोडगा न निघाल्यास 15 ऑगस्ट रोजी प्रवरासंगम येथील पुलावर काळे झेंडे फडकावून रास्ता रोको आंदोलन करत जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. निवेदनावर दिगंबर आवारे, पंडित सोनवणे, दादासाहेब आवारे, आदिनाथ केदार, बाबासाहेब आवारे, अंबादास बनकर, दामू गायकवाड, भास्कर गायकवाड, भाऊसाहेब मोटकर, अशोक आवारे आदींच्या सह्या आहेत. त्यांच्या आंदोलनास 'आप'ने पाठिंबा दिला आहे.

SCROLL FOR NEXT