नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका लक्ष्यवेधी प्रश्नावर उत्तर देताना पशुसंवर्धन विभागाच्या रिक्त जागा भरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीयची सन 2014 पासून रिक्त असलेली 160 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी त्यानंतरच्या एका बैठकीत पशुसंवर्धन अधिकार्यांना लम्पि आजारावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे श्रेणी 1 चे 77, श्रेणी 2 मधील 138, फिरता दवाखाना 1 असे एकूण 216 दवाखाने आहेत. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुमकर यांच्या मार्गदर्शनात या पशू दवाखान्यांतून 12 लाख मोठी जनावरे आणि 14 लाख छोटी जनावरे, तसेच कोंबड्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते.
मात्र, हे करत असताना सन 2014 पासून नवीन भरती नसल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या पशुधन पर्यवेक्षकांची 43 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशा 43 गावांत अतिरिक्त पदभार सोपवून पशुसंवर्धन विभाग काम करत आहे, तसेच शेतकर्यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना उपचार देण्यासाठी परिचर देखील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, 283 पैकी 105 पदे रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित दवाखान्यात परिचर नसल्याने पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होताना दिसतात. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी याबाबत आढावा घेतला असून, लवकरच मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात यास किती कालावधी लागेल, याकडे लक्ष आहे.
'लम्पि स्किन'बाबत विभाग जागृत
नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात 'लम्पि स्किन' आजाराने 9 गायी बाधित झाल्या होत्या. त्यापैकी 8 गायी बर्या झाल्या आहेत. एका गाईवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना आवश्यक त्या उपाययोजना, तसेच दक्षतेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय पशुसवर्धन विभाग लक्ष देऊन असल्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांना नगरच्या पशुसंवर्धन अधिकार्यांनी दिला आहे. रविवारी लोणीत पुन्हा विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
श्रेणीनिहाय रिक्त पदे अशी
पशुसंवर्धन विभाग श्रेणी 1 : 77 दवाखाने, श्रेणी 2 : 138 दवाखाने. पशुधनविकास अधिकारी – मंजूर 93, भरलेली 86, रिक्त 7, सहायक वि.आ. मंजूर 43, भरलेली 42, रिक्त 1, पशुधन पर्यवेक्षक : मंजूर 163, भरलेली 120 रिक्त 43, परिचर मंजूूर 283, भरलेली 178, रिक्त 105