खेड, विजय सोनवणे : कर्जत तालुक्यातील खेड येथील पशुवैद्यकीय दवाखाना अधिकारी, कर्मचार्यांअभावी अनेक दिवसांपासून ओस पडला आहे. या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचार्याची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी महसूल तथा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन खेडचे माजी उपसरपंच सचिन मोरे, नीलेश निकम यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व खा. सुजय विखे यांना नुकतेच दिले. खेड येथे जिल्हा परिषद सेसमधील पशुवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत उपलब्ध आहे. या इमारतीची मागील वर्षी देखभाल दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. इमारतीच्या रंग कामाबरोबरच या ठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. इमारतीच्या समोर पेव्हर, स्ट्रीट लाईट, संरक्षक भिंत आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारीच उपलब्ध नसल्याने, ही इमारत सध्या शोभेची वस्तू बनून राहिली आहे. त्यामुळे हजारो जनावरांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे.
खेड भीमा नदीच्या फुगवठ्यावर असल्याने शेतीबरोबरच पशुपालनाचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतो. परंतु, हजारो पशुपालकांना वैद्यकीय उपचारापासून वंचित रहावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे. हा शासकीय दवाखाना ओस पडल्याने खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची चांगलीच चंगळ सुरू आहे. उपचारासाठी पशुपालकांकडून ते मोठी रक्कम वसूल करत आहेत. या भागात अनेक तोतया डॉक्टर पदवी नसताना जनावरांवर किचकट उपचार करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त जागा भरून प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार असून, याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच विधानसभेत दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक ओस पडलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना पुन्हा एकदा 'अच्छे दिन' येतील, असा विश्वास पशुपालकांना आहे.