अहमदनगर

नगर : नैसर्गिक ओढे बुजविल्यानेच पूरस्थिती

अमृता चौगुले

नगर, सूर्यकांत वरकड : नगर शहरात साधारण सात ते आठ मोठे नैसर्गिक मोठे होते. मात्र, रहिवासी वसाहत वाढल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे बुजवून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहेत, तर ओढ्यामध्ये पाईप टाकून ओढा बुजवून टाकला, तर अनेक ठिकाणी ओढ्याची नैसर्गिक रुंदी घटविली आहे. त्यामुळेच पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याचे प्राथमिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले.

महापालिका हद्दीतील नालेगाव, बोल्हेगाव, सावेडी उपनगरमध्ये दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसतो. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन आणि नगरसेवक धावा-धाव करतात. मात्र, पुराचा पाणी निघून गेल्यानंतर पुन्हा सर्वकाही विसरून जातात. दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते. त्यावर कायमस्वरूपी कोणीही तोडगा काढत नाही. कारण नैसर्गिक ओढे-नाले नेमके कोणी आढविले. त्यात पाईप टाकण्यास कोणी परवानगी दिली. ओढ्या-नाल्यात बांधकामे करण्यास कोणी परवानगी दिली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यात संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान होते. मात्र, त्याची कोणालाही भरपाई दिली जात नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बोल्हेगाव, सावेडी उपनगरातील निर्मलनगर, गावडे मळा, नालेगाव, सर्जेपुरा रामवाडी आदी भागांमध्ये ओढ्या-नाल्याचे पाणी घरामध्ये घुसले. त्यामुळे नागरिकांना रात्र पाण्यात जागून काढावी लागली. नगरसेवक नागरिकांच्या मदतीसाठी धावधाव करीत होते. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अधिकृत बांधकामासाठी परवानगी मागितल्या जातात. सावेडी बोल्हेगाव, केडगाव या भागामध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे-नाले बुजून बांधकामे करण्यात आली आहेत, तर अनेक ठिकाणी ओढ्याचे रुंदी कमी करून बंद पाईपद्वारे पाणी काढून देण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याला नैसर्गिकरित्या जाण्यासाठी जागा राहिली नाही. परिणामी पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी ओढे-नाले अरुंद करण्यात आले आहेत. दहा फुटांचा ओढा बुजवून अगदी चार ते तीन फुटांचा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाईपमध्ये पाणी बसले नाही की तुंबले जाते आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी सभापती कुमारसिंह वाकळे, ज्येष्ठ नगरसेवक विनीत पाउलबुधे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि नगररचना विभागाची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यासाठी चौकशी समिती नेमावी, असेही सूचित करण्यात आले.

इथे बुजविला ओढा

सूर्यानगर अभियंता कॉलनी, जुना पिंपळगाव रोड ते गावडे मळा, नरहरीनगर ते मंगल हौसिंग, कुष्ठधामजवळील ओढा, हॉटेल पंचशीलसमोरील नाला, विश्रामगृह ते कलेक्टर ऑफिसपर्यंतचा नाला, नवीन कलेक्टर ऑफिस ते मारुती मंदिरापर्यंत नाला, पंकज कॉलनी येथील नाला, राधाबाई काळे महाविद्यालयाजवळ नाला, पत्रकार वसाहतीजवळील नाला, केडगाव-नेप्ती रोड ओढा, केडगाव नेप्ती रोड, श्रीकृष्ण कॉलनी, आगरकर मळा, खोकर नाला, पोलिस हेडकॉटरमधील नाला, वैष्णवी कॉलनी येथील नाला.

मनपा पाईप काढणार

शहरात अनेकांनी ओढ्यात पाईप टाकून अतिक्रमण केेले आहे, तर अनेकांनी ओढ्यातच अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यावर मनपा लवकरच ओढ्यातील पाईप काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

समितीला मुहूर्त मिळेना

महासभेमध्ये ओढे-नाले बुजविल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमावी. त्यात दोषी आढळणार्‍या मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यास पंधरा दिवस झाले तरी अद्यापि मनपाने चौकशी समिती नेमलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT