अहमदनगर

नगर : नालेसफाईची बोगस बिले दिल्याचा आरोप

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्व ठिकाणी नालेसफाई झाली असल्याचा कांगावा अधिकारी करीत आहेत. मात्र, प्रभाग दोनमध्ये संपूर्ण नालेसफाई न करता अधिकारी व ठेेकेदाराचा संगनमताने बिल काढण्याचा डाव असल्याचा आरोप माजी नगरसेवक निखील वारे, विनीत पाउलबुद्धे यांनी केला. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची आयुक्तांसमोर झाडाघडती घेतली.

सीना नदीसह सात नाल्यांची मनपातर्फे पावसाळ्याच्या तोंडावर साफसफाई करण्यात आली. अजूनही काही भागात नालेसफाई बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर वारे, पाउलबुद्धे यांनी संबंधित ठेकेदाराला आयुक्त डॉ. जावळे यांच्यासमोर उभे केले. नालेसफाईसाठी संबंधित ठेकेदार व उपअभियंता रोहिदास सातपुते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते बजेट शिल्लक नाही म्हणतात. मग नालेसफाई कशी करायची असा सवाल वारे यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद रस्त्यावरील सनी पॅलेस ते अभियंता कॉलनीकडे येणारा नाला शंभर मीटर सफाई करण्याचा राहिला आहे. वारंवार तक्रार करूनही ठेकेदार व अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. नालेसफाईचे अर्धवट काम करूनही त्याचे बिल काढण्याचा डाव आहे. नालेसफाई केल्याशिवाय बिले देऊ नयेत, असे वारे म्हणाले. दरम्यान, आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, संबंधित कामाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

SCROLL FOR NEXT