संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच- पाणी झाले. सोमवारी झालेल्या पावसामुळे बंदिस्त असणारी गटार अचानक तुंबल्यामुळे गटारीचे पाणी नवीन नगर रोडवर आल्यामुळे पुन्हा एकदा काहीकाळ सर्वत्र अशुद्ध पाणीच- पाणी दिसत होते.
गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने उघडे दिली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता, मात्र रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच- पाणी झाले. या पावसामुळे अनेकांची चांगली धांदल उडाली.
सोमवारी दुपारी पुन्हा संगमनेर शहरासह तालुक्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नवीननगर रोडवरील बंदिस्त गटार तुंबली. गटारीचे पाणी वर आल्यामुळे सर्वत्र पाणीच- पाणी झाले. हे पाणी अचानक रस्त्यावर येवून वाहनांच्या मशीनमध्ये शिरल्यामुळे अनेकांची वाहने बंद पडली. काहींना पाण्यातून मार्ग काढताना खूप तारेवरची कसरत करावी लागली. नवीन नगररोडवर पाणी येण्याचे प्रकार काही थांबता थांबेना. नगरपालिकेने त्वरित या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नवीन नगर रोडवरील दुकानदारांनी केली आहे.