अहमदनगर

नगर : नदीकाठच्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी

अमृता चौगुले

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : येत्या दहा दिवसात जायकवाडीच्या जलाशयाच्या काठावरील मालकी हक्काच्या जमिनींवरील अतिरिक्त पाण्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याकरता महसूल विभागासह संयुक्त मोहीम राबवावी, अन्यथा समर्पण फाऊंडेशनतर्फे तीव्र जलआंदोलन करण्याचा इशारा डॉ. करणसिंह घुले व सहकार्‍यांनी दिला आहे.

डॉ. घुल म्हणाले, ऑगस्टमध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीत जायकवाडीच्या जलाशयाचे अतिरिक्त पाणी गेले. यामुळे पिकांचे नुकसान झाले. जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाचे अपयश आहे. त्यातही जायकवाडीच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचे पंचनामे वेळेवर न करणे व धरण 100 टक्के भरल्यावर पंचनामे करू, असे सांगणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखे आहे. अशी तांत्रिक कारणे पुढे करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा काम जायकवाडीच्या व्यवस्थापन करीत आहे.

अधिकार्‍यांना शेतकर्‍यांसाठीचे पंचनामे व इतर सुविधांबद्दल विचारल्यास अपुर्‍या कर्मचार्‍यांची सबब पुढे केली जाते; परंतु प्रत्यक्षात कार्यरत अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर न राहता खासगी कामे करत फिरत असल्याचा अनुभव लाभधारक शेतकर्‍यांना नियमितपणे येत असतो.

18 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत उपविभागीय अभियंता पांडुळे त्यांच्या कार्यालयात आढळून आले नाही. त्यांच्या कार्यालयात फक्त एक महिला कर्मचारी उपस्थित होती. कार्यालयात चौकशी केली असता, उपविभागीय अभियंता पांडुळे पैठणला कामकाजानिमित्त गेल्याचे त्यांनी सांगितले. पैठणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता पांडुळे पैठणला आलेच नाहीत, असे समजले. शेवटी पांडुळे यांनीच स्वतः त्यांच्या खासगी कामानिमित्त शेवगाव येथे असल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, पंचनाम्यासाठी बाधित शेतकर्‍याने कार्यालयाकडे अर्ज करावा, असे सुचवले.

समर्पण फाऊंडेशनने पंचनाम्याची ही मागणी केली. येत्या दहा दिवसात जायकवाडीच्या जलाशयाच्या काठावरील मालकी हक्काच्या जमिनींवरील अतिरिक्त पाण्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागासह संयुक्त मोहीम राबवावी, अन्यथा समर्पण फाऊंडेशनतर्फे तीव्र जलआंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. करणसिंह घुले यांनी दिला.

शेतकर्‍यांची कामे टाळण्याकडे कल

जलाशयातील पुराच्या फुगवट्याच्या पाण्याचे व्यवस्थापन बघणार्‍या उपविभागीय अभियंत्यांना पाण्याने होणार्‍या नुकसानीची कल्पना असायला हवी. त्याबाबत उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयाचे धोरण शेतकरीभिमूख असायला हवे; परंतु असे प्रत्यक्षात न घडता, जायकवाडीच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनापासून कर्मचार्‍यापर्यंत सर्वांचा कल हा शेतकर्‍यांची कामे टाळण्याकडे असतो, असे धरणग्रस्त शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

जायकवाडीचे अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यबाबत अजिबात गांभीर्याने काम करत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना हेलपाटे मारूनही काम होत नाही. तुरुंगातून सुटलेला कैदी जसा पॅरोलवर घरी येतो, तसेच जायकवाडीचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर असतात. इतर वेळेला खासगी कामे करण्यात मग्न असतात.

                                                        – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशन

SCROLL FOR NEXT