अहमदनगर

नगर : धार्मिक स्थळांचा मार्ग होणार सुसाट

अमृता चौगुले

कर्जत / राशीन / सिद्धटेक, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ते करमाळा अशा 45 किलोमीटर राज्य महामार्गासाठी आमदार रोहित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून 253 कोटी रुपये मंजूर करून आणल्याने सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, राशीन येथील जगदंबा देवी व करमाळा येथील कमलादेवी अशी धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सिद्धटेक ते करमाळा, अशा 45 किलोमीटर महामार्गासाठी आशियायी विकास बँकेकडून 179 कोटी, तर राज्य सरकारकडून 75 कोटी रुपये, असे एकूण 253 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

सिद्धटेक ते राशीन अशा 24 किलोमीटर रस्त्याची निविदा निघालेली असून, या आशियायी विकास बँकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, तसेच दोन ठिकाणी वन विभागातून रस्ता जात असल्याने वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागत असल्याने त्या संदर्भातील अर्ज हा संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्यांच्याकडूनही मंजुरी मिळाल्यास तत्काळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. यानंतर राशीन-चिलवडी ते करमाळा या उर्वरित मार्गासाठी कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, ही निविदा निघाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होणार आहे.

यासोबतच कर्जत शहर ते खेडपर्यंतचा रस्ता यापूर्वी पूर्ण झाला आहे. त्याला पुढे कर्जत तालुका हद्द ते बारामतीपर्यंत आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून, त्यासाठीही 200 कोटींचा निधी टाकण्यात आला आहे. या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना वाहतूक आणि दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

दळणवळणाची होणार चांगली सुविधा!

सिद्धटेक येथे अष्टविनायकापैकी एक सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. संपूर्ण राज्यभरातून येथे भाविक येतात, असेच राशीन येथील जगदंबा मंदिर व करमाळा येथील कमला देवीच्या दर्शनासाठीही भाविक मोठ्या प्रमाणात येतात. ही सर्व धार्मिक स्थळे सिद्धटेक ते करमाळा या रस्त्यामुळे जोडली जाणार असल्याने भाविकांची सोय तर होईलच, शिवाय परिसरात दळणवळणाची सुविधा वाढून परिसराचा विकासही होणार आहे.

जामखेड-करमाळा रस्त्याचे काम लवकरच

जामखेड-नान्नज-जवळा-करमाळा व कुळधरण-कर्जत-करमाळा या मतदारसंघातून जाणार्‍या दोन्ही रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम आशियायी विकास बँकेकडून सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत त्याचा अहवाल बनवून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT