जामखेड : धामणगावात मृत अवस्थेत आढळलेला बिबट्या. यावेळी सरपंच महारूद्र महारनवर, वनविभाग आधिकारी. (छाया : दीपक देवमाने) 
अहमदनगर

नगर : धामणगावात आढळला मृत नर बिबट्या

अमृता चौगुले

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धामणगाव परिसरात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्यामुळे भीतीचे वातावरण असून, परिसरात अजून बिबटे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृत बिबट्याचा पाय झुडपात अडकल्याने त्या बिबट्याला शिकार करता आली नाही. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी धामणगाव सरपंच महारूद्र महारनवर, वनविभागाचे आधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोंगराळ परिसरात मृत बिबट्या आढळून आल्याने धामणगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा मृत्यू झुडपाच्या वेलीमध्ये पाय अडकून व उपासमारीने झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी प्रवीण उबाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप चौरै, किसन पवार, शिवाजी चिलगर, शहाजी नेहरकर, भाऊसाहेब भोगल आदी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाची पुढील कार्यवाही सुरू करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप चौरै यांनी जाग्यावरच मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.

मादी बिबट्याही असू शकतो

पाच महिन्यापूर्वी मोहरी परिसरात बिबट्याची काही पिल्ले आढळून आली होती; मात्र मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. धामणगावच्या घटनेवरून डोंगराळ परिसरात बिबट्याचा वावर होता. साधारण चार ते पाच दिवसांपूर्वीच या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. या भागात मादी बिबट्या ही असू शकतो, त्यामुळे शेतकर्‍यांनी सावध रहावे, असे अवाहन धामणगावचे सरपंच महारनवर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT