वाळकी : पुढारी वृत्तसेवा : दौंड महामार्गावर हिवरेझरे ते चिखलीच्या सीमेवर असलेल्या म्हसोबाचा ओढा परिसरात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.5) सकाळी ही घटना उघडकीस आली. सागर बाळू काळे (वय 25, रा. हिवरेझरे, ता. नगर), असे त्या तरुणाचे नाव आहे.
सागर हा अविवाहित असून, ट्रॅक्टर चालक आहे. सोमवारी (दि.4) दिवसभर काम केल्यानंतर तो चिखली येथे ट्रॅक्टर मालकाच्या घरी ट्रॅक्टर लावायला गेला होता. तेथून रात्री मोटारसायकलवर (एम.एच.16 डी.आर.7661) नगर-दौंड महामार्गाने हिवरेझरे गावाकडे येत असताना म्हसोबाचा ओढा परिसरात अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेने तो मोटारसायकलसह रस्त्याच्या बाजूला फेकला गेला.
अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. रात्रभर ही बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही. मंगळवारी (दि.5) सकाळी पावविक्रेता रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबला असता, त्याने अपघातग्रस्त मोटारसायकल आणि तरुणाला पाहिले. यानंतर त्याने काहींना फोन करून ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर हिवरेझरेतील नागरिक तेथे गेल्यावर मृत तरुण सागर काळे असल्याचे समोर आले.
सागर काळेच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ माधव बाळू काळे (रा.हिवरेझरे, ता.नगर) याच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.