अहमदनगर

नगर : दीड महिना उलटूनही विजेच्या तारा रस्त्यावरच

अमृता चौगुले

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या शेवटी कर्जत तालुक्यातील भोसे, चखालेवाडी, रुईगव्हाण परिसरात जोरदार वादळासह पाऊस झाला. या वादळामुळे झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्या. हा पाऊस होऊन दीड महिना उलटला, तरी आजपर्यंत तुटलेल्या तारा व मोडलेल्या खांबांची दुरुस्ती झालेली नाही. या तारा आजही लोंबकळलेल्याच आहेत.

त्यामुळे भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनील यादव आक्रमक झाले असून, तारा जोडून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे. मे महिन्याच्या शेवटी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील चखालेवाडी- बिटकेवाडी रस्त्यावरील विजचे खांब उन्मळून पडले होते. या खांबावरील विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यामुळे या लाईनवरील बत्ती गुल झाली होती. तुटलेल्या तारा रस्त्यावर पडलेल्या असल्याने वाटसरूंना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.

काही वाहन चालक तारा न दिसल्याने त्यामध्ये अडकून पडले आहेत. येथील शेतकर्‍यांनी अनेक वेळा महावितरणकडे पाठपुरावा केला; परंतु महावितरणच्या अधिकार्‍यांनी याची दखल घेतली नाही. शेतकर्‍यांना अधिकर्‍यांकडून तारीख पे तारीख मिळत गेली. विजेचे खांब शिल्लक नाहीत, काम करणारे मजूर उपलब्ध नाहीत, अशी कारणे शेतकर्‍यांना देण्यात आली.

चखालेवाडी येथील रस्त्यावर विजेच्या तारा दीड महिना पडून असल्याची माहिती सुनील यादव यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी करत शेतकर्‍यांशी चर्चा केली. दरम्यान चखालेवाडी – बिटकेवाडी रस्त्यावरील तुटलेल्या विजेच्या तारा तत्काळ जोडाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनील यादव यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

SCROLL FOR NEXT