अहमदनगर

नगर : दिवसा स्वबळाचा नारा; रात्री ‘आघाडी’चा वारा..!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँकेच्या उमेदवारी अर्ज स्वीकृतीला दोन दिवसांच्या शासकीय विश्रांतीनंतर आज सोमवारपासून पुन्हा एकदा जोर येणार आहे. सर्वच मंडळांनी केलेली स्वबळाची तयारी आणि इच्छुकांची वाढती संख्या पाहता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. मात्र, कोणत्याही मंडळांकडे विजयश्री खेचून आणेल, इतकी स्वतःची मते नाहीत. त्यामुळे दिवसा स्वबळाची वल्गना करणारे हेच 'बडे' नेते रात्री मात्र युत्या-आघाड्यांसाठी विरोधकांशीच 'बोलणी' करत असल्याची चर्चा आहे. यासाठी विकास मंडळाचाही 'तह' केला जात असल्याचे समजते.

24 जुलै रोजी शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसोबतच विकास मंडळाचीही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बँकेच्या उमेदवारीसाठी तालुका निहाय मुलाखती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोणत्या तालुक्यातून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत चाचपणी सुरू आहे. काही तालुक्यांत 'आयात' इच्छुकाला उमेदवारी देताना 'सोधा' कार्ड खेळले जाणार आहे, तर कुठं निष्ठावंतांना संधी देवून मंडळाची प्रतिमा जपण्यासाठीही शिक्षक नेते प्रयत्नशील असणार आहे.

काही मंडळात तर आतापासूनच उमेदवारीसाठी 'मागणी' सुरू झाल्याचीही चर्चा आहे.याशिवाय फोडाफोडी, उमेदवारीच्या शब्दांची खैरात, आणि युती आघाडीच्या जागा वाटपाच्या गुप्त बैठकांनाही रात्री वेग आल्याची चर्चा आहे. बँकेसाठी अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी 179 उमेदवारी अर्जाची विक्री झाली, तर 5 अर्ज दाखल झाले आहेत.4 जुलैला मतदान होणार आहे. छोट्या मोठ्या 12 संघटना या निवडणुकीत दिसणार आहेत.

काय आहे बँकेचे राजकीय गणित!

एकीकडे सर्वच मंडळे 21 जागांवर अर्ज भरण्याच्या तयारीत असले, तरी प्रत्यक्षात एकाही मंडळाकडे विजयासाठी आवश्यक असलेली 'मॅजिक व्होेट फिगर' नाही. संस्थेचे 10464 सभासद आहेत. निवडणूक तिरंगी झाली, तरी मागच्या निवडणुकीचा फरक पाहता खात्रीशीर विजयासाठी किमान 4 हजार मतांची बेरीज हवी आणि ही फिगर सध्यातरी स्वबळावर कुणालाही शक्य होणार नाही, असे दिसते.

विकास मंडळासाठी 545 अर्जांची विक्री

विकास मंडळासाठी दोन दिवसांत 545 अर्जाची विक्री झाली आहे. यात, बाबासाहेब आढाव यांनी सदिच्छा मंडळासाठी 105 अर्ज नेले आहेत. बापूसाहेब तांबे यांनी गुरुमाऊलीसाठी 100 अर्ज, गणेश वाघ यांनी रोहोकले गटासाठी 80, सुदर्शन शिंदे यांनी गुरुकुलसाठी 70, विकास डावखरे यांनी रोहोकले गटासाठीच 51, नाना गाढवे यांनी स्वराज्यसाठी 30, बाळासाहेब कदम यांनी ऐक्यकरीता 25, आबा लोंढे यांनी इब्टासाठी 25, चांगदेव काकडे यांनी शिक्षक भारतीसाठी 10, अंबादास गारुडकर यांनी थोरात गटासाठी 30 अर्ज नेले आहेत.

'गुरू'चा 11 जागांवर दावा,'राजें'च्या इच्छेवर पाणी!

दोन बड्या मंडळांच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठी जागा वाटपाची चर्चा झाल्याचे कानावर आले. त्यांच्या या 'ऐक्य'तेच्या आघाडीत अन्य काही छोट्या मंडळांनाही सोबत घेण्यावर विचारमंथन झाले. यात दोन प्रमुख मंडळांना 7-7 आणि इतर तीन घटक मंडळांना मिळून 7 जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, वरवर 'कुल' दिसणार्‍या 'गुरु'नी 11 जागांवर दावा केला. त्यामुळे ही बोलणी फिस्कटली. त्यामुळे तूर्ततरी 'राजें'च्या 'इच्छे'वर पाणी फेरल्याची चर्चा आहे.

'गुरुजी' नंबर एकचे शत्रू; 'बापू' तर नकोच..!
दोन दिवसांपूर्वी 'बापू' आमच्या संपर्कात असल्याची 'खबर' एका गटाच्या जबाबदार पदाधिकार्‍याने 'बाहेर' फोडली. मात्र,' बापूं'नी त्याचा स्पष्टपणे इन्कार करताना 'तो' गट आमचा एक नंबरचा राजकीय शत्रू असल्याचे सांगून 'युती'चे दार बंद केले. तर, दुसरीकडे शिस्तप्रिय 'गुरुजी' हे सत्तेसाठी 'झालं गेलं विसरून' पुन्हा 'बापू' यांना सोबत घेणार, असाही सूर होता. मात्र, याबाबत 'गुरुजी'च्या वर्गातील राजकीय 'प्राविण्य' मिळविलेल्या विद्यार्थ्याने 'बापू' सोबत तर नाहीच, अशा शब्दात चर्चेला पूर्णविराम दिला. 'डॉक्टर'ने मात्र 'बापू आणि गुरुजी'साठी आपल्या क्लिनिकचे दरवाजे उघडे ठेवले असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

SCROLL FOR NEXT