अहमदनगर

नगर : दारुमुळे विधवा झालेल्या महिलांचे उपोषण

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा : साहेब… नवरा गेला, मुलगा पण गेला.अन… दुसरा मुलगा दारूच्य आहारी गेल्याने मला दारू पिऊन मारझोड करतो. त्यामुळे रात्री मेणबत्तीच्या उजेडात काळजावर दगड ठेवून झोपावे लागतंय आता, तरी दारू बंद करा, अशी आर्त हाक नाजूबाई साळवे या महिलेने दारूबंदीच्या अधिकार्‍यांना स्वातंत्र्यदिनी देत अश्रूंना वाट करुन दिली.

अकोले तालुक्यात संगमनेर वरून इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावर दारू येऊन तालुक्यात वितरित होते. याबाबत ठोस कारवाई होत नसल्याबद्दल शाहूनगरमधील समाज मंदिरात दारुने विधवा झालेल्या महिलांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी हेरंब कुलकर्णी यांनी दारू विकणारे तडीपार करा, इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावरील हॉटेल कायद्याने सील करा, ज्या दुकानातून दारू येते. त्या दुकानाचा परवाना रद्द करा, दारूविक्री होणार्‍या गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करा, पंटरवर कारवाया न करता दारूविक्रेत्यावर कराव्यात, अकोल्यात उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय स्थापन करा अशा मागण्या मांडल्या.

या उपोषणकर्त्यांची जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, स.पो.नि मिथून घुगे यांनी भेट घेऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. दि. 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्यांवर समाधानकारक कारवाई न झाल्यास स्थगित केलेले उपोषण हे आमरण स्वरूपात गांधी जयंतीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा गंभीर इशारा दारुबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी दिला.

यावेळी विधवा भगिनींनी दारू उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, कर्मचार्‍यांना राखी बांधून दारू बंद करण्याची डोळ्यात पाणी आणून साद घातली. या उपोषणात दारुबंदी चळवळीचे हेरंब कुलकर्णी, राष्ट्रसेवा दलाचे विनय सांवत, गणेश कानवडे, प्रदीप हासे, वसंत मनकर, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, संतोष मुतडक, मनोज गायकवाड, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, नगरसेविका तमन्ना शेख, नगरसेविका जनाबाई मोहिते, नगरसेविका प्रतिभा मनकर, संगीता साळवे, नाजूबाई साळवे, लक्ष्मण आव्हाड, सुदर्शन पवार, अजय मोहिते, शाहूनगरमधील अनेक महिला उपोषणास बसल्या होत्या.

अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करणार

अकोले तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करणार असून पुन्हा आंदोलनाची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, तसेच अवैध दारू विक्री करणार्‍यांवर स्वतंत्र पथक नेमणार आहे, तर अकोल्यामध्ये नवीन दारु उत्पादन शुल्क कार्यालय उभारण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दारू उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

SCROLL FOR NEXT