अहमदनगर

नगर : दंगल..गोळीबार..अश्रूधूर अन् लाठीमार!

अमृता चौगुले

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : सकाळी अकराची वेळ, गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना, अचानक चोहोबाजंच्या रस्त्यांनी, गल्ली बोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला. त्यांनी आक्रमक होत जाळपोळ सुरू केली. तेवढ्यात सायरन वाजवित पोलिसांचा मोठा फौजफाटाही गावात दाखल झाला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. मग, पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावावर जोरदार लाठीमार केला आणि दंगल नियंत्रणात आणली. अग्निशामक दलानेही पाण्याचा फवारा मारत आग विझविली.

नगर तालुक्यातील वाळकीत गुरुवारी (दि.25) सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले होते. थोड्यावेळाने हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर गावकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आगामी गणेशोत्सव, तसेच दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले. वाळकी गावात प्रथमच अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आल्याने सुरुवातीला काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे, उपनिरिक्षक संदीप ढाकणे, सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे, पो.हे.कॉ. राहुल थोरात, गुप्त वार्ता विभागाचे रावसाहेब खेडकर, मच्छिंद्र पांढरकर, पो. ना. संभाजी बोराडे, ठाणगे, सचिन वनवे, पो. कॉ. राजू खेडकर, जयदत्त बांगर, राजेंद्र ससाणे, गणेश लबडे , महिला पोलीस कर्मचारी जयश्री फुंदे, मोहिनी कर्डक, गायत्री धनवडे, जायभाय यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यांचा मोठा फौजफाटा, अग्निशमन दलाची गाडी, दंगल नियंत्रण पथक, रुग्णवाहिका यांनी हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले. पोलिसांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गणेशोत्सवात गावात अचानक दंगल उसळली, तर काय करावे याचे हे प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात आले.

अन्यथा कडक कारवाई : सानप

गणेशोत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करावे. गणेशमूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुकीसाठी ऑनलाईन अर्ज करून पास घ्यावेत. उत्सवादरम्यान सामाजिक शांतता भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सपोनि राजेंद्र यांनी बजावले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT