वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी खंबीरपणे तुमच्या सोबत कालही होतो, आजही आहोत आणि उद्या पण राहणार, अशी ग्वाही देत शिवसेनेच्या नगर तालुक्यातील पदाधिकार्यांनी जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा 1 हजार शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहेत. तालुक्यातील पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि.19) मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते, रामदास भोसले, पाथर्डीचे रफीक शेख, नागरदेवळे येथील सुशिल कदम, रवींद्र धाडगे आदी उपस्थित होते.
नगरमधून यापूर्वीही 700 प्रतिज्ञापत्रे पक्षप्रमुख ठाकरे यांना देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 1 हजार प्रतिज्ञापत्रे समक्ष भेट घेऊन देण्यात आली आहेत, असे तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी सांगितले. नगर शहर व भिंगारमधील काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे गटात गेले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे व पदाधिकार्यांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे.