नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार बिबट्यांकडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत बिबट्यांचे वास्तव्य भवानी माता डोंगर परिसरात आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जेऊर परिसरातील गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये वर्षभरापासून बिबट्यांचे वास्तव्य व वावर आढळून आलेला आहे. बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. गेल्या वर्षभरात बिबट्याकडून चापेवाडी परिसरातील दादा काळे, शेटे वस्ती येथील नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली होती. त्याचवेळी वन विभागाने ठसे तपासून बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले होते.
खंडोबा माळ परिसरात भिवा घुले यांच्या पालावर हल्ला करत तीन मेंढ्या व एका कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली होती. गवारे वस्ती परिसरात तीन कुत्रे व चार शेळ्यांची शिकार करण्यात आली होती. चापेवाडी येथील बैलकुंडा जवळ चांगदेव कोकाटे यांच्या गायीची शिकार करण्यात आली होती. परिसरातील अनेक भटके कुत्रे, शेतकर्यांचे पाळीव कुत्रेही गायब झाले आहेत. मागील महिन्यात तोडमल वस्ती येथील कुरण परिसरात सूरज तोडमल यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला करून जबर जखमी केले होते, तर शेळीची शिकार केली होती. गवारे वस्ती परिसरात वन वनविभागाने पिंजराही लावला होता.
नगर – औरंगाबाद महामार्गावर सहा महिन्यांपूर्वी अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. जेऊर परिसरातील बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. जेऊर परिसराच्या चोहोबाजूंनी गर्भगिरीच्या डोंगर रांगा मोठ्या प्रमाणात असल्याने व वन्य प्राण्यांची संख्या जास्त असल्याने बिबट्यांसाठी हा परिसर नंदनवन ठरत आहे. जेऊरबरोबर पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंबा गड परिसरात ही बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, तेथेही पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत.
जेऊर परिसरात बिबट्याचे वास्तव आढळून आले आहे. शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. पाळीव प्राण्यांच्या ठराविक शिकार सोडता बाकी सर्व शिकारी डोंगर परिसरात झाल्याचे दिसून येते. जेऊर परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येत असला, तरी अद्यापपर्यंत मानवावर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही. ही समाधानाची बाब आहे, तरीही सर्व नागरिक, लहान मुले, शाळेतील विद्यार्थ्यांची योग्य काळजी घ्यावी.
– मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग.
बिबट्यांचा या परिसरात वावर
इमामपूर येथील तुकाई माता मंदिर डोंगर परिसरात गोशाळेतील घोड्याची शिकार बिबट्याकडून करण्यात आली. जेऊर परिसरातील ससेवाडी, चापेवाडी, डोंगरगण, डोणी परिसर, भवानी माता मंदिर परिसर, गवारे वस्ती, खंडोबा माळ या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर आढळून आला आहे, तसेच काळे वस्ती, तवले मळा परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले आहे. सद्यस्थितीत भवानी माता डोंगर परिसरात एक बिबट्या व त्याची दोन पिले दररोज शेतकर्यांच्या पाहण्यात येत आहेत. वन विभागाने या परिसराला भेट देऊन पाहणी केली.
वन विभागाकडून नागरिकांना मार्गदर्शन
जेऊर परिसरातील बिबट्याचे वास्तव्य लक्षात घेऊन वन विभागाने उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनेष जाधव, श्रीराम जगताप व वन कर्मचार्यांतर्फे परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.