अहमदनगर

नगर : डीजे वाजविल्यास कारवाई : पाटील

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव काळात दोन-दोन डीजे वाजविण्यास संपूर्ण जिल्ह्यात परवानगी देण्यात येणार आहे, मात्र प्लाजमा व इकोला कुठल्याही प्रकारची परवानगी राहणार नाही, परंतु दोन अधिक दोनच्या मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांवर व डीजे मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली. संगमनेर येथे शांतता कमिटीच्या बैठकीत पाटील बोलत होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक ज्योती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी राहुल वाघ, गट विकास अधिकारी अनिल नागणे, शहर प्रभारी सपोनि सुजीत ठाकरे, तालुक्याचे प्रभारी सुनील पाटील यांच्यासह महावितरण, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणुकीसह गणेशोत्सव काळात 'टू प्लस टू'च्या आवाज मर्यादेला परवानगी असली तरी आसपास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची सामाजिक जाणीव प्रत्येक मंडळांनी ठेवावी, अशी ताकीद पाटील यांनी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांना दिली.

गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस आरास पाहण्यासाठी रात्री 12 पर्यंत मुदत द्यावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष श्रीराम कंटुले यांनी मांडली. याची दखल घेत सर्व गणेश मंडळांनी एकत्रित येत ही मागणी केल्यास जिल्हाधिकार्‍यांना भेटून यावर निश्चित सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे मनोज पाटील यांनी सांगितले.

विसर्जन श्थळी मोजक्या पदाधिकाऱ्यांना परवानगी

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे म्हणाले, गणेश विसर्जनाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानीची घटना घडू नये, यासाठी विसर्जन ठिकाणी जाण्यास मोजक्या भक्तांना परवानगी दिली जाईल, परंतु सर्वांनाच परवानगी दिली जाणार नाही, असेही डॉ. मंगरूळे यांनी सांगितले. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कृत्रिम तलाव पालिकेच्या वतीने तयार करण्यात येतील. गणेश विसर्जनानंतर ते पालिका स्वखर्चाने पुन्हा जैसे- थे आहे, असे करून दिले जाईल विसर्जनाच्या प्रवरा नदीला वाहते पाणी राहील. विर्जनापूर्वी सर्व खड्डे बुजविले जातील. रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. शहरात फिरणार्‍या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून वेल्हाळे शिवारातील पांजरपोळमध्ये त्यांची रवानगी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत कमी आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी द्यावी. गणेशोत्सव काळामध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची शाश्वती महावितरणच्या अधिकार्‍यांनी द्यावी, अन्यथा, महावितरण अधिकार्‍यांच्या विरोधात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कैलास वाकचौरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, असे पतीत पावनचे प्रांताध्यक्ष सोपान देशमुख म्हणाले.

भाजप अध्यक्ष श्रीराम गणपुले म्हणाले, हायटेन्शनच्या विजेच्या तारांखाली लावलेली झाडे तोडली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. रंगार गल्लीतील रस्त्यांमधील चेंबरची झाकणे व्यवस्थित करावी. पाचव्या दिवसापासून परवानगीविषयी बोलणे करावे, अशी मागणी गणपुले यांनी केली. विनाकारण कोणावरही कारवाई करू नका, असे शिवसेना संपर्कप्रमुख नरेश माळवे म्हणाले. सूत्रसंचालन निलेश प्रभात यांनी, स्वागत सपोनि सुजित ठाकरे यांनी तर प्रास्ताविक पो. उपाधीक्षक राहुल मदने यांनी केले. आभार मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी मानले.

सोशल मीडियावर करडी नजर

गणेशोत्सव काळामध्ये पोलिस प्रशासनाची सोशल मीडियावर करडी नजर राहणार आहे. या कालावधीत कोणाकडूनही जातीय तेढ निर्माण होतील, असे संदेश पाठवू नये. प्रत्येकाने मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT