अहमदनगर

नगर : जेऊरला गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी नगर औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले आहे. जेऊर गावाला बुर्‍हाणनगर प्रादेशिक पाणी योजनेतून येणारी पाईपलाईन गॅसच्या कामामुळे वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाणी वाया जाते, तर ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अनेक वेळा सांगूनही गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून, जरे वस्तीनजीक पिण्याची पाईपलाईन फुटल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी आक्रमक होत काम करू देणार नसल्याची भूमिका घेतली. गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून, महामार्गाच्या मधोमध माती उकरून टाकण्यात आली आहे. त्यामुळे होणार्‍या अपघातांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी उपस्थित केला.

गॅस पाईपलाईनच्या कामात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. गॅस पाईपलाईनचे काम हे नियोजन शून्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला. जेऊर परिसरात कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर व ग्रामस्थांनी घेतली. शेतकरी, व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान करून पाईपलाईनचे काम सुरू आहे. व्यावसायिकांसमोर चर खोदून काम उरकले जाते. तिथे मुरूम टाकण्यात येत नसल्याने चिखल साचत असून मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मृदा संधारणासाठी शासन मोठ्या प्रमाणात खर्च करीत असून गॅस पाईपलाईन मुळे सुपीक माती वाहून जात आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने अनेकांचे बांध फुटून मोठे नुकसान झाले आहे.

ठेकेदार काम पूर्ण होईपर्यंत खोटी आश्वासने देतात. तुमचे सर्व काम व्यवस्थितपणे करून देऊ, असे सांगितले जाते. परंतु काम झाल्यानंतर कित्येक दिवस तिकडे फिरकतच नाहीत. तसेच फोन देखील उचलत नाहीत, असा आरोप व्यवसायिकांनी केला. जेऊर परिसरातील सर्व शेतकरी व व्यावसायिकांचे जे नुकसान झाले आहे, त्यांची भरपाई मिळावी, तसेच अपघातात मृत्यू झाल्या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू न देण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश तवले, दिनेश बेल्हेकर, दादा विधाते, सागर तोडमल, विजय बनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी ठेकेदाराशी हुज्जत घातली.

मनमानी कामावर नियंत्रण कोणाचे?
गॅस पाईपलाईनचे काम संपूर्णतः मनमानी पद्धतीने सुरू आहे. रस्त्यावर माती टाकल्याने अपघात होत आहेत. शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील लहान-मोठे पुल तोडण्यात आल्याने पाणी निघून जाण्यास जागा नाही. पर्यायाने शेतकर्‍यांचे बांध फुटून नुकसान होत आहे. अशा नियोजन शून्य कामावर नियंत्रण कुणाचे आहे की नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

गॅस पाईपलाईनमुळे शेतकरी, व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वारंवार शेतकरी, व्यावसायिक संबंधित ठेकेदाराशी वाद घालताना दिसतात. तरीदेखील प्रशासन शेतकरी, व्यावसायिक यांची दखल का घेत नाही ? या मागचे गौडबंगाल काय? जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, पोलिस, कृषी, तसेच वन विभागाने एकत्रित सदर कामाची तत्काळ पाहणी करून काम बंद करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
                                         – दिनेश बेल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य, जेऊर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT