नगर : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेनेही या चळवळीत सहभाग नोंदविताना 'अमृत पंधरवडा अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार समाजकल्याण विभाग हा जिल्ह्यातील शंभर टक्के ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करणार आहे. रोजगार हमी विभाग झेडपीच्या शाळा आणि अंगणवाड्यांभोवती जैविक संरक्षक भिंती उभारणार आहे.
शिक्षण विभाग 150 शाळांना लोकसहभागातून शुद्ध पाणी पुरवठा व अन्य भौतिक सुविधा देणार आहे. माध्यमिक शिक्षण विभाग 151 शाळा आदर्श करणार आहे. ग्रामपंचायत विभाग एकल महिलांची नोंदणी करणे, किमान 25 टक्के संशयित अपहार प्रकरणे जिल्हा परिषदेकडे सादर करणार आहे. लघू तालुका पाटबंधारे विभाग जलशक्ती अभियानात किमान 45 बंधारे बांधून पूर्ण करणार आहेत.
बांधकाम उत्तर आणि दक्षिण विभाग किमान 100 शाळा, अंगणवाडी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणार आहे, तसेच नव्याने तपासणी करून गळती लागलेल्या इमारतींचे दोष निवारण कालावधीत दुरुस्ती करणार आहे.
पाणी पुरवठा विभाग हर घर जल योजनेत प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावांत या योजनेचा लाभ देणार आहे. कृषी विभाग महाडीबीटीमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कागदपत्रे 100 टक्के जमा करून शेतकर्यांना बांधावर खतांचे वाटप करणार आहे. महिला बालकल्याण विभाग सॅम आणि मॅम श्रेणीतील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे. दरम्यान, सीईओ येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी या अभियानाबाबत अधिकारी आणि कर्मचार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, तसेच या पंधरवाड्यात नियोजन केलेल्या कामांत हलगर्जीपणा केल्यास कारवाईची तशी ताकीदही दिली आहे.