अहमदनगर

नगर जिल्ह्यात तेरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : गुरुपौर्णिमा, अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती व संत गोदड महाराज रथयात्रा कर्जत हे उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 13 ते 26 जुलै 2022 या कालावधीत नगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगर शहर व जिल्ह्यात या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच विविध राजकीय पक्ष कामगार संघटनांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनेवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी, यासाठी संपूर्ण नगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

यांना दिली सवलत

शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशांनुसार कर्तव्यपूर्तीसाठी स्वत:जवळ हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, विहीत प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने आयोजित निवडणूक प्रचार सभा, सभा घेणेस अगर मिरवणूका काढणेस ज्यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींसाठी हे आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT