नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात काल श्री गणेशाचे आगमन झाले. डीजे, ढोलपथक, ढोलताशा व सनई चौघड्यांच्या सुरांमध्ये जल्लोषात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 2500 मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यात 325 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला जिल्ह्यात आनंदात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गावोगाव श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यंदा पारंपरिक वाद्यांच्या जोडीला डीजे व ढोलपथकाचा दणदणाट पाहायला मिळाला. संपूर्ण गावाने मिळून एकाच श्री गणेशाची स्थापना करावी, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन तरुण मंडळे, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती करीत असते. परंतु, प्रशासनाच्या प्रयत्नांना तितकेसे यश येत नाही. यंदा संपूर्ण जिल्ह्यात 2550 मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यातील केवळ 325 गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 47 गावामध्ये एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, कर्जत तालुक्यात अवघ्या दोन गावांत एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी गणेशोत्सवामध्ये भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.
तालुकानिहाय एक गाव एक गणपती
नगर तालुका 24, पारनेर 27, श्रीगोंदे 13, जामखेड 18, कर्जत 2, पाथर्डी 9, शेवगाव 10, नेवासे 13, श्रीरामपूर 16, राहुरी 17, कोपरगाव 13, राहाता 7, अकोले 47, संगमनेर 42फ..
खासगी गणपती 125
लहान मंडळे 900
मोठे मंडळे 1200
सार्वजनिक मंडळे 2100
एक गाव एक गणपती 325
एकूण गणपती 2550