नगर, पुढारी वृत्तसेवा : क्षेत्र कोणतेही असो, त्या ठिकाणी महिलांना संधी दिल्यास त्या निश्चितच उत्तम काम करतात. नगर जिल्हा परिषदेतही काल स्थानांतरण प्रक्रियेत सीईओ आशिष येरेकर यांनी बांधकाम विभागासारख्या ठिकाणी महिलांना संधी देऊन एक आदर्श उभा केला आहे. दरम्यान, ही प्रक्रिया पारदर्शी राबविण्यासाठी एकत्रीकरण पद्धतीचा प्रयोग करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यालयातील स्थानांतरणाची मोठी चर्चा सुरू होती. या स्थानांतरणात बांधकाम, ल. पा. सारख्या विभागातील मौल्यवान 'टेबल' आपल्याला मिळावेत, यासाठी काहींनी फिल्डींगही लावली होती. मात्र, राज्यात सर्वच क्षेत्रात आज महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेतही महत्वाच्या विभागात संधी दिली, तर त्या निश्चितच चांगले काम करतील, असा सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांना विश्वास होता.
त्यामुळे कालच्या स्थानांतरणात सीईओंनी ल.पा, पाणी पुरवठा विभागाबरोबरच उत्तर बांधकाम विभागात दोन कनिष्ठ सहायक महिला, आणि दक्षिण बांधकामाला दोन कनिष्ठ सहायक महिलांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्थानांतरण प्रक्रिया पारदर्शीपणे राबवितानाच बांधकाम विभागात प्रथमच महिलांना संधी देणारे अधिकारी म्हणून येरेकर आणि लांगोरे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे जि. प. प्रशासनाचे कौतुक होताना दिसत आहे.