नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. त्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपबरोबर युती करायची नाही. शिवसेना लढाऊ पक्ष असून, लढण्याची तयारी करा, अशा सूचना दिल्या. दरम्यान, मंत्री शिंदे यांच्या बंडानंतर विविध पक्षातील पदाधिकार्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मनसुंबे बांधले होते. मात्र, ठाकरे यांच्या भूमिकेने त्यावर विरजण पडले.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षाच्या विरोधाच बंड पुकारले आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदे यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण राज्याचेच राजकारण ढवळून निघाले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर, आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्षाची महाशक्ती आहे, असे म्हटले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ही सर्व खेळी भाजपची असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपकडून त्यास अधिकृत दुजोरा अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्याने राज्यात भाजप व शिंदे गट असे सरकार स्थापन होण्याची शक्यता असल्याचा तर्क लावला जात आहे. तसे झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेतही मोठे फेरबदल पहायला मिळतील, असे मानले जाते. जिल्ह्यात काही दहा नगरपालिकाचा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आगामी काळात होत आहे. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजप व शिंदे गट अशी युती होऊन सरकार स्थापन झाल्यास आपल्याला कोणत्या पक्षातून तिकीट मिळणार याची चाचपणी आतापासून सुरू झाली आहे.
शिवसेना हा मुळातच लढणार पक्ष आहे. आतापर्यंत अनेकांनी बंड केले, त्यांचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांपैंकी 90 टक्के बंडखोर पुन्हा निवडून येणार नाहीत. ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेना कदापी नगरच नव्हे तर राज्यात भाजपसोबत युती करणार नाही.
– शशिकांत गाडे,
शिवसेना, जिल्हा प्रमुख, दक्षिण
राष्ट्रवादीशी युती ही मजबुरी..!
महापालिकेत सध्या महापौर शिवसेनाचा तर उपमहापौर राष्ट्रवादीचा आहे. त्यात उद्या राज्यात काही वेगळी घडामोड झाल्यास स्थानिक शिवसेना-भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करू शकते, अशी चर्चा होती, मात्र ती आज फोल ठरली. महापालिकेतील राष्ट्रवादीसोबतची युती शिवसेनेचे एका गटाला मान्य नाही. केवळ वरिष्ठांचा आदेश असल्याने मजबुरीने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत आहेत, असे ते खासगीत बोलतात. भाजपसोबत सत्ता स्थापन होण्याचे मनसुबे बांधत सेनेच्या एका गटाने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र आज ठाकरे यांनी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत घरोबा होणार नसल्याचे ठणकावून सांगितल्याने त्यावर पाणी फेरले आहे.