अहमदनगर

नगर : जिल्हा परिषद पंचायत समिती गट, गणांची गुरुवारी आरक्षण सोडत

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा: ओबीसी आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची तर प्रत्येक तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मात्र, यंदा ओबीसी प्रवर्गाच्या जागा घटण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. त्यानुसार गट व गणांची अंतिम रचना 7 जूनलाच जाहीर झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने त्यानंतर 13 जुलै रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 12 जुलै रोजी आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा नुकताच ओबीसी अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.

गुरुवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरु सभागृहात जिल्हा परिषद गटांची तर पंचायत समित्यांच्या 170 गणांची त्या-त्या तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाची प्रारुप यादी 29 जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार असून, या यादीवर 2 ऑगस्ट 2022 पर्यत हरकती मागविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे 11 व जमातीचे 8 गट , तर चौदा पंचायत समित्यांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे 22 व जमातीचे 16 गण निश्चित असून, सोडतीव्दारे ते कोणत्या गटात व गणांसाठी असणार याबाबत गुरुवारी फैसला होणार आहे.

ओबीसींसाठी 22 गट, 39 गण?
जिल्हा परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाला 19 जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा गटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ओबीसीसाठी 23 गट राखीव राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नवीन नियमानुसार ओबीसीसाठी 22 गट तर पंचायत समित्यांमध्ये अंदाजे 35 ते 39 गण राखीव असण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT