अहमदनगर

नगर : जवळा ‘व्हायरल’ आजारांनी त्रस्त

अमृता चौगुले

जवळा, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा परिसरासह इतर गावात अनेक ग्रामस्थ 'व्हायरल' आजारांनी त्रस्त झाले आहेत. लहान मुलांचे प्रमाण यामध्ये अधिक असून, ग्रामस्थांमध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पेशी कमी होणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. शासकीय यंत्रणा मात्र अजूनही सुस्तावलेली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

गावातील आरोग्य उपकेंद्राची इमारत दिसायला खूप सुसज्ज आहे. परंतु, तेथे औषधेच उपलब्ध नसल्याने उपचारासाठी जाणार्‍या ग्रामस्थांची संख्या घटली आहे. तेथेे रक्त तपासणीसाठी नमुने घेतले जातात, पण रिपोर्ट मात्र मिळतच नाहीत. रुग्ण तोपर्यंत दुसरीकडे उपचार घेऊन बराही होतो. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

जवळा गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलमधील सुमारे तीस ते चाळीस विद्यार्थी आजारी असल्याचे समजते. तर, दीडशे ते दोनशे ग्रामस्थ विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु, आरोग्य विभागाचे अजूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे संसर्गजन्य आजारांबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर आरोग्य यंत्रणेने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

दरम्यान, जवळ्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थाच आता 'आजारी' पडण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी ग्रामीण भागातील जनतेतून केली जात आहे.

SCROLL FOR NEXT