अहमदनगर

नगर : जखमी वानराचा रुग्णवाहिकेतून प्रवास

अमृता चौगुले

जेऊर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील सुनील पवार युवा प्रतिष्ठानच्या बायजामाता रुग्णवाहिकेमुळे अपघातात जखमी वानराचे प्राण वाचल्याची घटना इमामपूर घाटात रविवारी (दि. 19) घडली. नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटात वानराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

घटनेची माहिती समजल्यानंतर जेऊर येथील सुनील पवार युवा प्रतिष्ठान संचलित रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेत जखमी वानराला जेऊर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी वानरावर उपचार करण्यात आले.

उपचारानंतर त्याच रुग्णवाहिकेतून जखमी वानराला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या नगर येथील कार्यालयात हलविण्यात आले. वन्य प्राण्याला जीवनदान देण्यासाठी ही रुग्णवाहिका धावून गेल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलेे. त्यांच्यामुळे जखमी वानराला जीवनदान मिळाले.

सुनील पवार म्हणाले, वन्य प्राणी भूतलावावरील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचे जतन, संरक्षण होणे गरजेचे आहे. याप्रसंगी वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, माजी सरपंच विकास कोथिंबिरे, अध्यक्ष मधुकर मगर, गणेश पवार, शाखाधिकारी सुनील ससे, रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, सुरज पवार, आकाश तोडमल, उपसरपंच श्रीतेश पवार, अनिल ससे, नीलेश पवार, शरद तोडमल, सचिन मस्के, मुकेश साळवे आदी उपस्थित होते.

अपघातात जखमी अवस्थेत महामार्गावर वानर पडले असताना वनविभागाच्या गाडीची वाट न पाहता सुनील पवार युवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने वानराला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. यावरून माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांवर असलेले प्रेम यातून दिसून येते. प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

-श्रीराम जगताप, वनरक्षक, वनविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT