काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडे वाहणार्या घोडनदीपात्रात मळीचे पाणी सोडल्याने नदीतील पाणी दूषित होऊन यामध्ये लाखो मासे मृत झाले आहेत. याबाबत दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी येथे घोडनदीपात्रात दूषित पाण्याची पाहणी केली.
पंचनामा करीत पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. सहकार महर्षी शिवाजी नागवडे सहकारी साखर कारखान्याने आपल्या कारखान्याच्या केमिकलयुक्त मळीचे पाणी घोडनदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन लाखो मासे मृत झाले. तसेच, या भागातील शेतकर्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
याबाबत भैरवनाथ सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शेखर मोरे यांच्यासह शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची दखल घेत बुधवारी (दि.20) घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तेथे काही ठिकाणी मृत मासे आढळून आले. तर, नदीत पाण्याचा रात्रीतून प्रवाह वाढल्यामुळे अनेक मृत मासे वाहून गेले. काही प्रमाणात पाणी स्वच्छ झाले असून, दुर्गंधी कायम आहे. अधिकार्यांनी येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेले आहेत. लवकरच याचा अहवाल सादर होईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे नागवडे कारखान्याच्या मळीचे पाणी कारखान्यापासून जंगलेवाडी मार्गे पाचपुतेवाडी, राहिंजवाडी, संतवाडी येथून पाच किलोमीटर अंतरावरून घोडनदी पात्रात ओढ्यातून मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे या भागात वर्षभर दुर्गंधी, उग्रवास येत असल्यानेे येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. याची दखल कारखाना प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी काष्टी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.