कोळपेवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील गरजू पात्र कुटुंबांना घरकुलाच्या यादीतून वगळण्यात आले होते. याबाबत या नागरिकांनी श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याची दखल घेऊन या पात्र कुटुबांना घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भात फेरसर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली.
शासन निर्देशाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर नाही अशा नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. अशा पात्र कुटुंबांची 'आवास प्लस प' मार्फत नोंदणी करण्यात आली. मात्र, मंजूर घरकुल यादीत मतदार संघातील अनेक गावांतील हजारो पात्र कुटुंबांचे नावेच नसल्यामुळे हे कुटुंब घरकुलापासून वंचित राहिले होते. त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ देण्याबाबत अपात्र ठरवण्यात आले होते.
याप्रश्नी ना. काळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे पात्र कुटुबांचा फेर सर्वेक्षण करून त्यांना लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा केल्याने पात्र लाभार्थ्यांचा फेर सर्व्हे करून, या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे 5000 पेक्षा जास्त कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, ज्या पात्र कुटुंबांची नावे घरकुल यादीत आलेले नाहीत, अशा कुटुंबांचा फेरसर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कुटुंब प्रमुखांनी माहिती फेर सर्व्हे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्यावी, असे आवाहन ना. काळे यांनी केले आहे.
घरकुलप्रश्नी ना. काळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे अशा पात्र कुटुंबांचा फेर सर्वेक्षण करून त्यांना लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा केल्याने पात्र लाभार्थ्यांचा फेर सर्व्हे झाला असून, या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.