राहुरी : परराज्यातून आलेली झाडे महसूलच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेली आहेत. 
अहमदनगर

नगर : ‘ग्रीनफिल्ड’च्या नावाखाली एजंटांचे चांगभलं

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न ठरत असलेला सुरत – हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गामुळे शेतकर्‍यांचे शेती क्षेत्र अधिग्रहण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच एजंट सक्रिय झालेले आहेत. अधिक मोबदला मिळवून देण्यासाठी कागदोपत्री प्रक्रियांसह अधिग्रहीत क्षेत्राचे मुल्य वाढविण्यासाठी एजंटांकडून खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार राहुरी व बारागाव नांदूर हद्दीतील शेतकर्‍यांना परराज्यातून आणलेली मोठी झाडे पुरविले जात असतानाच महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली.

सुरत-नाशिक-नगर-सोलापूर-हैदराबाद या बहुचर्चित ठरत असलेल्या सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकर्‍यांचे शेती क्षेत्र अधिग्रहणाची तयारी सुरू आहे. केंद्राकडून हा महामार्ग तयार व्हावा म्हणून युद्धपातळीवर तयारी सुरू असतानाच काही एजंट लोकांनी शेतकर्‍यांना प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पातील सर्व शासकीय अधिकारी आमच्या संपर्कात आहे. जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी सर्व कागदपत्रे आम्हीच तयार करून देऊ. जास्तीत जास्त मोबदला मिळावा म्हणून शेतकर्‍यांनी शेतामध्ये अधिक उत्पन्न देणारी झाडे लावून देऊ, असे सांगत जिल्ह्यात एक मोठा समूह कार्यरत झाला आहे.

समृद्ध महामार्गासाठी अधिग्रहण होणार्‍या शेती क्षेत्राची कागदपत्रे घेऊन संबंधित एजंट शेतकर्‍यांची भेट घेत आहेत.
दरम्यान, राहुरीत 44 किमी क्षेत्र ग्रीनफिल्ड झोनमध्ये येत आहे. ग्रीनफिल्ड अधिग्रहणासाठी अधिक मोबदला मिळवून देण्यासाठी एंजट सक्रिय झाले आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत परराज्यातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची आयात सुरू असल्याची माहिती मिळाली.

ग्रीनफिल्डसाठी जमिनी अधिग्रहण करण्यापूर्वी शेती क्षेत्रामध्ये मोठ मोठी झाडे लावत अधिक मोबदला मिळविण्याच्या उद्देशाने झाडे आयात केली असल्याची माहिती मिळताच तहसीलदार शेख यांसह तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, सामाजिक वनीकरणचे अधिकारी, मंडळाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी बाचकर, कोतवाल संजय बाचकर, महेश देशमुख, कर्मचारी व पोलिस प्रशासनाने ट्रक, ट्रॅक्टरसह सुमारे पाचशे आंब्याची मोठी झाडे जप्त केली आहे. या कारवाईने समृद्ध महामार्गाच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या एजंट टीमचा पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा लागलेली आहे. याबाबत महसूल विभागाकडून चौकशी सुरू आहे.

चौकशी केली जाणार : तहसीलदार शेख

परराज्यातून कोणत्याही प्रकारचे कागदपत्रांचे पुरावे नसताना शेकडो मोठी झाडे आणली जात आहे. ग्रीनफिल्ड हायवेचे अधिग्रहण होण्यापूर्वी शेतकर्‍यांच्या शेती क्षेत्रामध्ये मोठी वृक्षारोपणाचा प्रयत्न समजला. कारवाई केली असून एजंट लोकांकडून हा प्रकार होत असल्याचे समजले आहे. त्यामुळे प्रकरणाची सविस्तर चौकशी होण्यासाठी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे तहसीलदार शेख यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT