नगर, शशिकांत पवार : सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत घरे, झाडे, पाईपलाईन अशी मालमत्ता आल्यास त्याचे मुल्यांकन वाढणार आहे. काही अधिकार्यांनी टक्केवारी ठरवून मालमत्तेच्या वाढीव मुल्यांकनासाठी शेतकर्यांशी सौदेबाजी सुरू केली आहे. पाच वर्षांची वाढलेली झाडे थेट शेतात लावली जात असल्याच्या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत चौकशी अहवाल जिल्हाधिकार्यांकडून मागविला आहे. त्यातूनच राहुरीच्या जयकिसान हायटेक नर्सरी मालकावर कारवाई करण्यात आली आहे.
ग्रीनफिल्ड सर्वेक्षणातील लाचखोरीला आळा घालण्याच्या सूचना नाशिक विभागीय आयुक्तांनी नगर जिल्हाधिकार्यांना देताच त्यांनी तातडीने बैठक बोलविली. त्या बैठकीनंतर कृषी विभागाने राहुरी येथील एका नर्सरीवर कारवाई करत 550 झाडे हस्तगत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगर जिल्हाधिकारी तसेच भूसंपादन अधिकारी यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. चौकशी अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी भूसंपादन अधिकारी, कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. शेतकर्यांना झाडे कोण विकतयं, कोण खरेदी करून लावतयं, यासंदर्भात चौकशीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्याचे समजते. कृषी विभागाच्या चौकशीत राहुरी येथील जय किसान हायटेक नर्सरीवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांनी विकलेली 550 झाडेही हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वाढीव मूल्यांकन मिळावे यासाठी पाच वर्षापूर्वी झाडे लावल्याचा दिखावा केला जात आहे. त्यासाठी उंच बुंधा, पसारा असलेली झाडे थेट बालसाड आणि राजमहेंद्री येथून आणली जात आहेत. सर्वेक्षण करणारे कर्मचारी, अधिकारी नोंदणी करताना 10 टक्के तर कृषीचे अधिकारी मुल्यांकन करताना पुन्हा 10 टक्याचे वाटेकरी असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे गेली.
शेतकर्यांशी महसूल, कृषी अधिकार्यांनी संगनमत करून शासकीय निधीचा बिनभोबाट लूट चालविली आहे. त्याची दखल घेऊन त्यावर जरब बसवा, अशी तक्रार सोपान रावडे यांनी 23 जुलै रोजी विभागीय आयुक्तांकडे केली. त्याची दखल घेत या सर्व प्रकाराची चौकशी सुरू झाली आहे.
राहुरी येथील जयकिसान हायटेक नर्सरीवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी, श्रीरामपूर.