नगर, पुढारी वृत्तसेवा : प्रभाग दोनमध्ये भारत गॅस कंपनीचे पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. तक्रार करून संबंधितांनी दखल घेतलेली नाही. गॅस कंपनीने रस्ते खोदाईपोटी जमा केलेले 7 कोटी 85 लाख रुपये इतरत्र खर्च न करता, आमच्याच प्रभागात विकासकामांवर खर्च करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रभाग दोनच्या नगरसेवक व नागरिकांनी केली.
नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखील वारे व नागरिक सुभाष तळेकर, राजेंद्र काळे, जे. के. जाधव, देवेंद्र जोशी, भानुदास गावडे, किशोर महामुनी, बी. एस. दंडवते, वसंतराव अडसूळ, आर. आर. साठे, बाबा दळवी, सूरज बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, प्रभाग दोनमध्ये भारत गॅस लि. या कंपनीमार्फत गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्ण प्रभागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिक आमच्याकडे वारंवार रस्त्याबाबत तक्रारी करीत आहेत.
कंपनीने रस्ता खोदाईपोटी सुमारे 7 कोटी 85 लाख रुपये भरले आहेत. या कंपनीने प्रभागात गॅस लाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईपोटी जमा केलेली रक्कम ही प्रभाग दोनमध्येच विकासकामांवर खर्च करावी. असा आदेश संबंधितांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.