वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अनेक खोल्यांना पावसामुळे गळती लागली असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन, या सर्व शाळाखोल्या दुरूस्त कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा येथे नुकतीच जिल्हा परिषद निधी अंतर्गत शाळा खोली बांधण्यात आले आहे. परंतु, ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पहिल्याच पावसात छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत संबंधित ठेकेदाराला कळविले असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.
तसेच, हराळ मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात गळती लागून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित शाळा विद्यार्थी व पालकांनी स्वखर्चाने दुरूस्त करण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात गुंडेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे यांना या शाळा दुरूस्तीसाठी निधीबाबत विचारले आसता, शाळा दुरूस्तीसाठी पुढील आराखड्यात निधी टाकता येईल. परंतु, सध्या शासन स्तरावर निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षी तरी गुंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टिपकत्या गळतीखालीच धडे घ्यावे लागणार आहेत.