करंजी : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री पंकजा मुंडे मोहटादेवी दर्शनासाठी पाथर्डी तालुक्यात आल्या, त्यावेळी नगर ते पाथर्डीपर्यंत त्यांच्या वाहनाचे सारथ्य करीत खा. सुजय विखे यांनी जांब कौडगाव, मराठवाडी, करंजी, देवराई, तिसगाव, निंबोडीपर्यंतच्या अतिशय खराब झालेल्या रस्त्याचा अनुभव घेतला.
त्यामुळे त्यांनी बोलल्याप्रमाणे स्वतःची यंत्रणा लावून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे यांनी केली. गेल्या सहा-सात वर्षांपासून कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम नगर ते पाथर्डीपर्यंत रखडले आहे. ठेकेदार बदलले, अधिकारी बदलले, खासदारही बदलले.
मात्र, रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अनेकांनी या महामार्गाच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले. अर्धवट कामामुळे शंभरहून अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर हे काम पूर्ण होणार, असा सवाल अॅड. पालवे यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर खड्डे बुजविण्याच्या सूचना प्रशासनाला देणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.