नगर, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदा गणेशोत्सव धूमधडाक्यात करण्याची तयारी सार्वजनिक मंडळांकडून सुरू आहे. दहीहंडी जोरदार झाल्याने नगरकरांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक गणोशोत्सव मंडप परवानगीसाठी महापालिकेने स्वतंत्र कक्ष उभारला आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यास मंडपास 24 तासात परवानगी देण्यात आहे. त्यासाठी मंडळांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
कोरोनामुळे सर्वच सण उत्सवावर आलेले निर्बंध यंदा हटले आहेत. अबाल वृद्धांपासून सर्वच जण गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. 31 ऑगस्ट रोजी घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचा कामाला सुरूवात केली आहे. पावसाने उघडकीप दिल्याने मनपा प्रशासनाचे काम सोपे झाले आहे. दुसरीकडे मनपाने गणेश मंडळाना मंडप उभारणीसाठी परवागनी देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे. गणेश मंडळाने कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मागितल्यानंतर चोवीस तासात परवानगी देण्यात येणार आहे.
गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊन मंडप उभारवा. अनाधिकृत मंडप उभारू नये. गणेश मंळडांनी कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत परवानगी घ्यावी.
– सुरेश इथापे, शहर अभियंता तथा नोडल अधिकारी