पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा: वामनभाऊनगर परिसरात सुरू असलेले भूमिगत गटारीचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे तक्रार केली आहे.
नगरपरिषदेच्या नाली विकास कर निधीतून वामनभाऊनगर परिसरात 130 मीटर भूमिगत गटारीचे काम सुरू आहे.
अंदाजपत्रकात कामासाठी वापरण्यात येणारी उच्चप्रतीची साधनसामुग्री व गटारीचा नकाशा देण्यात आला. पाईपलाईनची खोली, चेंबरचा आकार, पाईपचा आकार, स्टीलची साईज, पाईपची जाडी, बेडची जाडी, गटारीचा उतार, असा सविस्तर आराखडा आहे. प्रत्यक्षात सुरू असलेले काम अंदाज पत्रकाप्रमाणे होत नाही.
अंदाजपत्रकात नमूद साहित्य, सामुग्री वापरण्यात आलेली नाही. नकाशाप्रमाणे काम झालेले नाही. परिसरातील काळ्या मातीमुळे खोलवर पाया लागत नाही. पाईप खचू नये म्हणून बेड काँक्रिट केले नाही. मुख्याधिकार्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तर बिल अदा होणार नाही : लांडगे
संपूर्ण कामाची चौकशी होईपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी मागणी करण्यात आली. अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्यास ठेकेदाराचे बील अदा केले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्याधिकारी लांडगे यांनी दिली.