अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोहणे शासकीय आश्रमशाळेत भात कच्चा, तर वरणात दाळच दिसेनाशी झाली. आंघोळीला गार पाणी, प्यायलाही अशुद्ध पाणी, भाजीपाला खराब झाला, जेवणालाही ताटं नाही, शौचालये खराब असे दयनीय अवस्थेत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे अक्षरशः अंगावर शहारे आणणारे विदारक चित्र आ. डॉ. किरण लहामटे व प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांच्या उघड्या डोळ्यांसमोर आल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळणार की मुख्याध्यापक, स्वयंपाकी, कर्मचार्यांवर काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा व दर्जात्मक अन्न, आरोग्य, शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विभागाकडून लाखो रुपये खर्च केले जाते, तसेच राजूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून डी. बी. टी. अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शालेयनिहाय 5 ते 9 हजार रुपये शालेय साहित्य घेण्यासाठी दिले जाते. पण मात्र आदिवासी भागातील आश्रमशाळेचा निकालाची टक्केवारी घसरल्याचे दिसत आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी अति दुर्गम भागातील कोहणे शासकीय आश्रमशाळेला आ. डॉ. किरण लहामटे व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी, गटविकास अधिकारी राहुल शेळके, उपअभियंता महेंद्र वाकचोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, नायब तहसीलदार गणेश माळवे आदींनी अचानकपणे भेट दिली.
कोथळे शासकीय आश्रय शाळेत 230 विद्यार्थी आहेत. दुपारी जेवताना वरणात दाळ नव्हती, स्वयंपाकींनी लक्ष न दिल्याने भाजीपाला खराब झाल्याचे विदारक वास्तव चित्र पाहून आमदार डॉ. लहामटे व सर्वच अधिकारी सुन्न झाले होते. मर्जीतील दोन स्वयंपाकी कर्मचार्यांना इतरत्र सेवावर्ग केल्याने आम्ही दोनच स्वयंपाकी महिला कर्मचारी आहे. डोक्यावर पाणी आणून स्वयंपाक बनविल्याचे महिला कर्मचार्यांनी सांगितले. मर्जीतील कर्मचार्या मर्जीप्रमाणे इतरत्र सेवा वर्ग केल्याचा भांडाफोड झाला आहे.
कोहणे शासकीय आश्रमशाळेत कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासारख वरण व कच्चा भात खावा लागतो. हे पाहून मन हेलावून जाते. एकीकडे आदिवासी विभाग आदिवासींना कशा प्रकारे वागणूक देत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी स्पर्धा करावी, अशी अपेक्षा ठेवते. इथे आदिवासी मुलांचे शोषण होतय. हे विद्यार्थी उद्याच भवितव्य असून दोषी आढळणार्यांवर निलंबन करून घरी बसवा. कोहणे आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकाराबाबंत विधान भवनात आवाज उठवणार आहे.
– डॉ. किरण लहामटे , आमदार