अहमदनगर

नगर : कोरडगाव हद्दीतील महावितरणचे खांब धोकादायक

अमृता चौगुले

कोरडगाव, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव व जिरेवाडी येथील गावठाण हद्दीअंतर्गत महावितरणचे विजेचे खांब व वीजवाहक तारांंची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी खांब धोकादायक स्थितीत असून, तसेच वीजवाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत

गावात मिरवणुका असो, अगर शेतकर्‍यांच्या कापसाच्या गाड्या असो, त्यावेळी सदर वाहनांना मोठी उंची असते. अशावेळी गावातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तारा बांबूच्या साहाय्याने वर उचलून वाहन बाहेर काढावे लागते. खंडित वीजपुरवठ्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अनधिकृत वीजवापर, शासनाने वाटलेल्या घरगुती गिरण्यांचा लोड रोहित्रावर आल्यानंतर ग्राहकांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो. फ्यूज जाऊन विद्युत पुरवठा खंडित होतो.

स्थानिक वायरमनचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर संबंधित अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाहीत.
गावातील धोकादायक खांब बदलण्यासाठी चार ते पाच वर्षांपासून आणलेले लोखंडी खांब, तसेच पडल्याने मातीत गाडले गेले आहेत. त्याकडे अधिकार्‍यांचे लक्ष नाही. गावातील विजेचे खांब, वीजवाहक तारांचे काम तातडीने करावे, गावठाण डीपीच्या फ्युजा नवीन बसवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच थ्री फेज विद्युत पुरवठा रात्री बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतातील वस्त्यांना अंधारात रहावे लागते.

गेल्या पंधरा दिवसांपासून शेतातील वस्त्यांना विद्युत पुरवठा होत नसल्याने चोरांचा सुळसुळाट झाला आहे, तसेच सर्पदंशांच्या घटना वाढल्या आहेत. जिरेवाडी येथील थ्री फेज रात्री चालू ठेवण्याची मागणी भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत नवीन कामांचे नियोजन नाही. मेन्टेनन्समधून शक्य असणारी कामे होतील. रात्री शेतीपंपांचा थ्री फेज विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश उच्च पातळीवरून असल्याने वस्त्यांची वीज बंद राहते.

                                                            – प्रिया मुंढे, सहायक अभियंता, महावितरण.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT