अहमदनगर

नगर : केडगावात चार दुकानांसह दोन घरे चोरट्यांनी फोडली

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरातील एकनाथनगर परिसरात मंगळवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चार दुकाने आणि दोन घरांचे कुलूप तोडून दागिने, रोख असा 58 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. एकाच दिवशी चोरट्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

प्रतिभा राजू क्षेत्रे (38, रा. एकनाथनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या मुलासह कामानिमित्त पाथर्डी तालुक्यातील येळी येथे दि. 18 रोजी गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी प्रतिभा क्षेत्रे यांचे घर उघडे असून, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्याची माहिती त्यांच्या नणंदेने फोनवरून दिली.

दरम्यान, क्षेत्रे या दुपारी घरी आल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख त्यांना मिळून आले नाहीत. तसेच, ममता सुनील घिया यांच्या घरातील चांदीचे शिक्के चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. तसेच, घराशेजारीलच सत्यम मेडिकल व जगदंब डेअरी, बालाजी मेडिकल, गुरू एंटरप्रायजेस या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बी. एम. इखे हे करत आहेत.

बंद घरे चोरांकडून लक्ष्य

गेल्या काही दिवसांत नगर शहरासह उपनगरात चोर्‍यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंद असलेली घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT