श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : पढेगाव-मालुंजा रस्त्यावर चारचाकी व दुचाकीला धडक दिल्याने राहुरी तालुक्यातील एक तरुण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता ही दुर्घटना घडली.
पढेगाव ते मालुंजा रस्त्यावर दुचाकी (नं. एमएच 17 बी डब्ल्यू 07 9 8) वरून रस्त्याच्या कडेने जात असताना पढेगाव शिवारात विठ्ठलवाडी, बोरकरवस्तीजवळ वळणावर चारचाकी गाडी नं. (एम एच 20 सी. एस. 26 97) वरील चालक काळे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत गाडी चालवून समोरून येणार्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील उदय ज्ञानेश्वर पवार (वय 23, रा. माहेगाव, ता. राहुरी) हा तरुण जागीच ठार झाला, तर विजय रामदास गलांडे (वय -22 वर्षे, रा. माहेगाव, ता. राहुरी) हा जबर जखमी झाला.
दरम्यान, या अपघातप्रकरणी किरण शिवाजी टेकाळे (रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) या तरुणाने तालुका पोलिसात फिर्याद दिली. वाहनचालक दिलीप दत्तात्रय काळे (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.