कोळपेवाडी, पुढारी वृत्तसेवा : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा साई संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे. उपाध्यक्षपदी दिलीपराव बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली. त्यास अनिल कदम यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदाची सूचना सूर्यभान कोळपे यांनी मांडली. त्यास प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ना. आशुतोष काळे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून कारखान्याची जबाबदारी पार पाडत आहे. तोट्यात असलेला कारखाना सभासद व संचालक मंडळाच्या सहकार्याने नफ्यात आणला. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन जिल्ह्यात उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली. निसर्गाचा लहरीपणा आणि साखर धंद्याविषयी असलेली अनिश्चितता यामुळे साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने आहेत. परंतु, सहकाराची जपवणूक करताना सभासद हित डोळ्यासमोर ठेवून माजी आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ संचालक माजी आ. अशोकराव काळे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक राजेंद्र घुमरे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, मनोज जगझाप, शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, दिनार कुदळे, प्रवीण शिंदे, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे आदी उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून अतिरिक्त ऊस प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्यामुळे, मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे 2022-23 चा गळीत हंगाम नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार असल्याचे अध्यक्ष आशुतोष काळे म्हणाले.