बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील 32 वर्षीय युवकाचा मृतदेह विहीरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. काल (दि.14) सकाळी ही घटना उघडकीस आली. कर्जुले पठार येथील दशरथ संभाजी पडवळ (वय 32, रा. कर्जूले पठार, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे.
गावातील पोलिस पाटील भाऊसाहेब देवके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हा बुधवारी रात्री घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी रात्रीच त्याची शोधा-शोध करण्यास सुरूवात केली. नातेवाईकांशी संपर्क साधला, परंतु तो कोठेच आढळून आला नाही.
दरम्यान, गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह गावातील भानुदास पवार यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला.
याबाबत पोलिस पाटील देवके यांनी घारगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घारगाव पोलिस करीत आहेत. दशरथ पडवळ यांनी आत्महत्या केली की, आणखी काही याचा तपास पोलिस करीत आहेत.