कर्जत : गणेश जेवरे : येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे 'असून अडचण अन् नसून खोळंबा,' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूमी अभिलेख विभागातील उपाधीक्षक कार्यालय सध्या रामभरोसे असून, हे कार्यालय भूमिगत झाले की काय? अशी म्हणन्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. या कार्यालयातील कामकाजाबाबतही नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
कार्यालयावर आयुक्त व जिल्हा अधीक्षक यापैकी कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कर्मचार्यांचा मोठा वनवा या कार्यालयात आहे. जे अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात आहेत, त्यातील अपवाद वगळता बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात येतच नाहीत. त्यांचे भ्रमणध्वनी कायमस्वरुपी बंद असतात. अधिकारी आणि कर्मचार्यांना विचारणा केली असता संबंधित कर्मचारी कोणालाच दात देत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या या कार्यालयात 22 पैकी केवळ 14 कर्मचारी कार्यरत आहेत. हेही फक्त कागदावर असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात कार्यालयात कधीही सर्व कर्मचारी उपस्थित राहात नाहीत. तालुक्यातील ग्रामीण भागामधून शेतकरी कार्यालयात कामासाठी येतात, तेव्हा कर्मचारी वा अधिकारी नसल्याने त्यांना तसेच परत जावे लागते. जे उपस्थित कर्मचारी असतात, ते कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. संबंधित कर्मचार्यांवर जबाबदारी ढकलून तेही मोकळे होतात. तर दुसरीकडे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
दोन महिन्यापूर्वी या कार्यालयातील दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तरीही अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाडस वाढले आहे. कार्यालयातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नोंदी करण्यासाठी आजही पुढाकार घेतला जात असून, या कार्यालयात 'पैसे द्या अन् कोणते पण काम करून घ्या, कुठल्याही नोंदी लावा, असे धोरण सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
कार्यालयात 14 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यातील बहुसंख्यजन अनुपस्थित राहतात. मोजणीसाठी गेलेत, बाहेर गेले आहेत, कामांसाठी गेले, अशी उत्तरे कार्यालयामधून देण्यात येतात. सखोल चौकशी केली असता कर्मचारी कामावर आले नाहीत, असे दिसून येते. यामुळे या कर्मचार्यांची हजेरी, येण्याची वेळा आणि अनुपस्थित राहिल्यास त्याची जबाबदारी आदींची तपासणी कोण करणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कार्यालयाला कोणी वाली नाही का?, असा प्रश्नही विचारला जात आहे.
कर्जतच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील उपाधीक्षक पद रिक्त होते. या ठिकाणी पाटील यांची नेमणूक करण्यात आली. ते हजर झाले अन् लगेच रजेवरही गेले आहेत. यामुळे नागरिकांना कामासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे कार्यालयामध्ये आयुक्त व जिल्हाध्यक्षकांसह वरिष्ठांनी दखल घेऊन, कार्यालयाची भरारी पथकाकडून तपासणी करणे आवश्यक आहे.