अहमदनगर

नगर : औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बनले दारू विक्रेत्यांचे केंद्र!

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील स्टेशन रस्त्यावर असलेले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे मावा, गटखा खाणार्‍यांसह गावठी दारू विक्रेत्यांचे केंद्र बनल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. अतिक्रमण करून अवैध धंदे चालविणार्‍यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.

गुटखा, सिगारेट, मावा व दारू विक्रीबाबत शैक्षणिक विभागाने आपले आदेश पारित केलेले आहे. गुटखा, मावा व दारू आदी व्यसन केंद्र हे शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरात नसावे, असा आदेश आहे. परंतु राहुरी तालुक्यातील स्टेशन रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षक केंद्र हे गेल्या काही वर्षांपासून व्यसनाचे केंंद्र बनल्याचे चित्र आहे. आयटीआय केंद्राच्या दोन्ही बाजूला अवैध धंदे करणार्‍यांनी आपले बस्तान निर्माण केलेले आहे. याकडे अन्न, औषध प्रशासनासह पोलिसांनी केलेले दुर्लक्ष पाहता संताप व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यासह परिसरामध्ये मावा विक्री करण्याचा गोरखधंदा शासकीय आयटीआय केंद्रालगत थाटण्यात आला आहे. यासह याच परिसरात माव्यासह गुटखा विक्रीही जोमाने केली जाते, तर दुसर्‍याच बाजूला देशी-विदेशी दारूसह गावठी दारू विक्री करणार्‍यांचा अड्डाही चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे शिक्षणाचे माहेर घराला दारू, मावा व गुटखा विक्रेत्यांनी विळखा मारले आहे. त्यामुळे आयटीआय केंद्रामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या बालमनावर केंद्रात शिक्षणाचे धडे तर बाहेर व्यसन करण्याचे आमंत्रण दिले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

राहुरी स्टेशन रस्त्यावरील आयटीआय केंद्राला अवैध धंदे करणार्‍यांनी आपले नको ते उद्योग धंद्याचे ठिकाण केले आहे. याच परिसरातून संपूर्ण तालुक्यासह लगतच्या तालुक्यांना तंबाखू मावा परविला जात आहे. राजरोसपणे सुरू असलेला हा धंदा पोलिस प्रशासनासह अन्न, औषध प्रशासन उघड्या डोळ्याने पाहता आहे. अवैध धंदे करणार्‍यांना एकप्रकारे शासकीय प्रशासनाचे पाठबळ लाभत आहे. त्यामुळेच मावा, गुटखा व दारू विक्रेत्यांचे फावले जात असून संबंधितांनी आपले अतिक्रमण वाढविण्यास प्रारंभ केला आहे.

रस्त्याच्या लगतच अतिक्रमण करीत अवैध धंदे करणार्‍यांचा बंदोबस्त व्हावा, शासकीय आयटीआय केंद्र हे अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. अन्न, औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करीत अवैध मावा व गुटखा विक्री करणार्‍या त्या गुटखा किंगचा बंदोबस्त करावा तर दारू विक्रीसाठी थाटलेल्या त्या अवैध दुकानदारांवर कारवाई कधी करणार ? असा संतप्त प्रश्न परिसरातून विचारला जात आहे.

मुलांच्या शिक्षणाला गालबोट

मुलांना आगामी काळात उद्योग व्यवसाय करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी पालकांनी मुलांना शासकीय औद्योगिक केंद्रामध्ये पाठविले. परंतु या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला अवैध व्यावसायिकांनी विळखा घातला आहे. परिसरात मुला-मुलींचे वसतिगृह आहेत. रात्री-अपरात्री तळीरामांचा िंधंगाणा सुरू असतो. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्टेशन रस्त्यावरील परिसर डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा होत आहे.

SCROLL FOR NEXT