नगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात ओबीसी 27 टक्के राजकीय आरक्षण देण्यात यावे, असा निकाला न्यायालयाने आज दिल्याने भाजपतर्फे फटाके उडवून, महिलांनी फुगड्या खेळून जल्लोष केला. तर, समता परिषद व ओबीसी संघटनांतर्फे महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच शहर भाजपाच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. ढोल तशा वाजवत व फटाके फोडून जल्लोषात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाच्या पदाधिकार्यांनी नाचून व महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, शहर भाजपचे सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, माजी उपमहापौर मालन ढोणे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते. ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी संघटनांच्या वतीने माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी समता परिषदचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, डॉ. सुदर्शन गोरे, सावता परिषदचे नितीन डागवाले, छबूनाना जाधव, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, सतीश डागवाले, वसंतराव पटवेकर, बाळासाहेब पुंड, रामदास फुले, प्रशांत शेरकर, मोहीत चौधरी आदी उपस्थित होते.
राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसांत ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे व राज्यातील युती सरकारचे जाहीर आभार मानतो.
– किशोर डागवाले, प्रदेश उपाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा