अहमदनगर

नगर : ‘एक गाव एक गणपती’ला थंडा प्रतिसाद यंदा गावांची संख्या घटली

अमृता चौगुले

श्रीकांत राऊत :

नगर : कोरोना निर्बंधाच्या दोन वर्षानंतर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. उत्साहात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना प्रशासनाच्या 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेला यंदा मंडळांना फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसते. 1 हजार 399 गणेश मंडळांनी 'श्रीं'च्या प्रतिष्ठापनेसाठी परवानगी मागितली असून यातील 323 गावांनी एकजूट दाखवित एकाच ठिकाणी 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. गतवर्षी 380 गावात ही संकल्पना राबविली होती. कोरोना निर्बंध पूर्णपणे हटविल्यानंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या गणेशोत्सवाआडून राजकीय प्रदर्शनही केले जात आहे. त्यामुळेच 'एक गाव एक गणपती' संकल्पेला यंदा थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

वातावरणातून सुटका झाल्यानंतर यंदा गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात अन धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात 323 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' या उपक्रमाअंतर्गत बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आल्याने या गावांमध्ये एकजूट असल्याचे चित्र आहे. मात्र, आकडेवारीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपक्रमाला काही प्रमाणात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी 380 गावांत 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविली गेली, यंदा त्यात 57 ने घट होऊन 323 गावांनी ही संकल्पना राबविली आहे.

स्थानिक राजकारणामुळे पोलीस यंत्रणेवर ताण वाढतो. हा ताण कमी व्हावा, सलोख्याचे वातावरण राहून सामाजिक एकोपा जपावा यासाठी पोलिस प्रशासनाने जागृती करत ' एक गाव, एक गणपती' संकल्पनेवर जोर दिला. मात्र गतवर्षापेक्षा कमी प्रतिसाद त्याला मिळाला. यंदा कोणतेच निर्बंध नसल्याने अन् त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समितीची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत इच्छुकांनी गावागावात 'रसद' पुरवित राजकीय शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे.

धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन अपर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 35 पोलिस निरीक्षक, 47 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 68 पीएसआय आणि 3 हजार 45 पोलिस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त गणेशोत्सवासाठी तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याबाहेरून एक पोलिस उपअधीक्षक, 2 पोलिस निरीक्षक, 5 एपीआय, 5 पीएसआय, 20 परिविक्षाधीन पीएसआय, 100 परिविक्षाधीन पोलिस कर्मचारी, 12 होमगार्ड व राज्य राखीव दलाची 1 कुमक असा अतिरिक्ति बंदोबस्त जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला पोहचला आहे.

उत्कृष्ट कार्य करणार्‍या मंडळांना पारितोषिके
सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक भान ठेवून उत्कृष्ट उपक्रम राबविणार्‍या गणेश मंडळांना प्रशासनाकडून पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यासाठी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलिस ठाणेनिहाय एक गाव एक गणपती

भिंगार-1, नगर तालुका-16, एमआयडीसी-2, पारनेर-23, सुपा-15, श्रीगोंदा-13, बेलवंडी-10, जामखेड-18, शेवगाव-1, पाथर्डी-5, नेवासा-10, शनिशिंगणापूर-1, सोनई-2, शिर्डी-2, राहता-5, लोणी-3, कोपरगाव तालुका-3, कोपरगाव-2, श्रीरामपूर शहर-4, श्रीरामपुर तालुका-4, राहुरी-18, संगमनेर शहर-10, संगमनेर तालुका-26, राजूर-72, अकोले-40, घारगाव-14, आश्वी-3.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT