श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : ओव्हरटेक करताना इनोव्हा कारची जोराची धडक बसल्याने दुचाकास्वारासह मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. श्रीरामपूरलगत हरेगाव फाटा येथे दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूरकडून इनोव्हा कार (क्र. एम. एच. 4 4 बी 7130) श्रीरामपूर- हरेगाव फाटामार्गे नेवासेकडे लोक सोहळ्यासाठी जात असताना हरेगाव फाटा येथे स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम. एच. 17 सी. एस. 4745) वरील दोन तरुणांना ओव्हरटेक करताना जोराची धडक बसली.
या अपघातात दोन्ही तरुणांच्या पायांसह पाठ व कमरेला जबर मार लागला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी पो. नि. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. संतोष परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही जखमी तरुणांना नागरिकांनी साखर कामगार रुग्णालयात हलविले.
या ठिकाणी नेहमी अपघात होतात. हरेगाव फाटा, अशोकनगर फाटा या ठिकाणी गतिरोधक बसवावे, यासाठी सरपंच आबासाहेब गवारे, राजेंद्र गवारे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर ससाणे, सागर गवारे, संदीप गवारे, बबलू गवारे, मुनीर सय्यद, पत्रकार राजेंद्र देसाई यांनी केली आहे. अपघाता संदर्भात पुढील तपास पो. उ. नि. समाधान सुरवाडे व पो. ह. संतोष परदेशी करत आहेत.
प्रशासनाकडून मागणीला केराची टोपली..!
फाट्यालगत रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे, परंतु प्रशासनाकडून या मागणीला केराची टोपली दाखविले जाते. परिणामी प्रवाशांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.